खांदेश्वर पोलिस ठरले महिलेसाठी देवदूत..
खांदेश्वर पोलिस ठरले महिलेसाठी देवदूत..

पनवेल दि.०९ (संजय कदम) : जखमी महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलीला मदतीचा हात देऊन सदर महिलेवर दवा-उपचार केले तसेच सहा वर्षीय मुलीला निवारा मिळवून दिल्याने या दोघांसाठी खांदेश्वर पोलिस हे देवदूत ठरलेत.

दिनांक 20 मार्च  2022  रोजी  साई प्रसाद हॉटेल च्या बाजूस सेक्टर 8, खांदा कॉलनी येथील बस स्टॉप चे बाजूला एक महिला जखमी अवस्थेत व तिच्यासोबत एक साधारण 06 वर्षाची मुलगी दिसून आली. त्याबाबत त्या महिलेकडे पोलीस हवालदार भाऊसाहेब मोरे यांनी विचारपूस करता त्यांचे पती  सुजीत कुमार यांचा मृत्यू झालेला असून त्या मूळच्या नारंग फेटा, लकडी पूर, मुसा फेटा, हैदराबाद राज्य- आंध्रप्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले. पनवेल परिसरामध्ये त्यांचे निश्चित असे राहण्याचे ठिकाण नाही. तसेच त्या पाय घसरून पडलेल्या असून त्यामुळे त्यांना चालता येत नसल्याचे व त्यांना उपचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सदर महिला नामे ज्योति सजीत कुमार के, वय 30 वर्ष यांना उपचारार्थ एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले. त्यांचे पायाचे हाड  मोडले असल्याचे निदान झाले. त्यांना झालेल्या नमूद दुखापतीवर खांदेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून किरकोळ वर्गणी जमा करून ऑपरेशन करून व पायामध्ये रॅाड टाकून इलाज केला व त्यानंतर तिला आज डिस्चार्ज दिल्याने विश्रांतीसाठी रियल मेरी होम आश्रम, खैरवाडी, मोरबे या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांची मुलगी दृष्टी वय 06 वर्षे हिला कमल अर्णव चारीटेबल ट्रस्ट, नवीन पनवेल या ठिकाणी सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेले आहे.

सदरचे कामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाऊसाहेब मोरे, पो. कॉ. गीते व पो. कॉ. राजेश पालवे यांनी सदर महिलेस मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करून सामाजिक दायित्व निभावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


फोटो : वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्यासह पोलिस अधिकारी मदत करताना
Comments