वळवली गावातील मुख्य रस्त्याचे तातडीने नुतनीकरण न केल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा..
 आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली गावातील मुख्य रस्त्याचे तातडीने नुतनीकरण न केल्यास 15 एप्रिलपासून गावातील रस्त्यावरच ग्रामस्थ उपोषणास बसतील असा इशारा आज शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेवून त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभागप्रमुख विश्‍वास पेटकर, मा.सरपंच दिलीप पाटील, पुरातन शिव मंदिर अध्यक्ष मारुती पाटील, उपाध्यक्ष मारुती पालेकर, उमेश पेटकर, संदीप पाटील, आकाश पेटकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विश्‍वास पेटकर यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली गावापासून वावंजे रस्त्याला जोडणार्‍या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून महानगरपालिका स्थापनेपासून या रस्त्याकडे नव्हे तर संपूर्ण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने पत्र देवून सुद्धा फक्त आश्‍वासने देण्यात आली आहेत. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. यात ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. तरी या मुख्य रस्त्याचे काम तातडीने करण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत, अन्यथा येत्या 15 एप्रिलपासून गावातील रस्त्यावर सर्वच ग्रामस्थ उपोषणास बसतील असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.
फोटो ः आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना विश्‍वास पेटकर यांच्यासह इतर सहकारी.
Comments