महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगडचा विजय..

रायगडचा हिंगोली विरुद्ध विजय व नाशिक विरुद्ध बरोबरी..

नाशिक :-  नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  14 वर्षाखालील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाने आपल्या गटातील तीन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यामध्ये हिंगोली विरुद्ध विजय मिळवून सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाशिक विरुद्धचा दुसरा सामना बरोबरीत सुटला. हिंगोली विरुद्धचा सामना महात्मा नगर क्रिकेट स्टेडियम या मैदानावर  7 व 8 फेब्रुवारी 2022 रोजी झाला. या सामन्यामध्ये पहिल्या डावात हिंगोली संघाने प्रथम फलंदाजी करताना 97 धावा केल्या. रायगडच्या अमेय पाटील  याने 12 षटकात 17 धावा देऊन 5 बळी घेतले. त्याला साईराज जोशी याने आठ षटकात 22 धावात 2 बळी व कप्तान ओम म्हात्रे याने 4 षटकात 26 धावात 3 बळी घेऊन मोलाची साथ दिली. 
रायगड संघाने आपल्या पहिल्या डावात एकूण 214 धावा केल्या.  आघाडीचे फलंदाज विनोद भोईर 77 चेंडूत 40 धावा व क्रिश भाईरा 83 चेंडूत 61 धावा यांनी 24.1 षटकांमध्ये 100 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. हिंगोली संघ दुसऱ्या डावात 129 धावात गारद झाला. या डावात देखील  रायगडच्या अमेय पाटील याने पुन्हा 14.1 षटकात 33 धावांत 5 बळी घेतले व संपूर्ण सामन्यात 10 बळी घेण्याची किमया केली. त्याला दुसऱ्या बाजूने 31 धावांत 3 बळी घेऊन साईराज जोशीने चांगली साथ दिली. रायगड संघाने आपल्या दुसऱ्या डावात उर्वरित लक्ष 5.2 षटकांमध्ये पूर्ण करून सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. गटातील दुसरा सामना याच मैदानावर 10 व 11 फेब्रुवारी 2022 रोजी नाशिक या स्थानिक संघाविरुद्ध खेळविण्यात आला. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये रायगड संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. 
रायगड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व आपल्या द्रुतगती गोलंदाजांनी पहिल्या 5.1 षटकांमध्ये 2 बळी मिळवत कप्तानाचा हा निर्णय सार्थ ठरवला. परंतु नंतर नाशिकच्या फलंदाजांनी शंभर धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर मात्र ठरावीक अंतराने रायगडच्या गोलंदाजांनी बळी मिळवत नाशिकचा पहिला डाव 228 धावांमध्ये संपवला. रायगडच्या शौर्य गायकवाड याने सतरा षटकांमध्ये 44 धावा देऊन सर्वाधिक 5 बळी घेतले व त्याला अमेय पाटील व साईराज जोशी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत सुंदर साथ दिली. नंतर फलंदाजी करताना रायगडच्या पार्थ पवार 20 धावा व क्रिश बहिरा 79  यांनी 57 धावांची भागीदारी नोंदवत चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या विकेट करता 33 धावांची भागीदारी करताना क्रिश पाटील याने 28 चेंडूत 26 धावा केल्या. पाचव्या विकेट करता पुन्हा क्रिश बहिरा व कप्तान व म्हात्रे यांनी 30.1 षटकांमध्ये 68 धावांची भागीदारी नोंदवली. सहाव्या विकेट करता कप्तान ओम म्हात्रे व निलेय सावंत यांनी 7.2 षटकांमध्ये 22 धावांची भागीदारी केली. तेव्हा रायगडचा धावफलक 78.5 षटकांत 6 बाद 191 असा होता. पुढे ठराविक अंतराने रायगडचे फलंदाज बाद होत गेल्याने रायगड संघाचा धावफलक नऊ बाद 212 असा झाला. त्यानंतर शेवटच्या गड्या करता स्मित पाटील नाबाद 11 धावा व साईराज जोशी नाबाद 7 धावा यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत उर्वरित 5.1 षटकांमध्ये 16 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना दोघांनी तीन धावा पळून काढल्या त्यामुळे संघाचा धावफलक 9 बाद 228 असा झाला व सामना बरोबरीत सुटला. 

 13 फेब्रुवारी पासून नाशिक विरुद्ध हिंगोली व रायगड विरुद्ध औरंगाबाद असे सामने सुरू झाले. या सामन्यांच्या निर्णयावर पुढील सुपर लीग फेरी करीता कोण पात्र ठरणार हे निश्चित होईल. असे विवेक बहुतुले, सरचिटणीस, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, रायगड. यांनी सांगितले.
Comments