दोन लाखासाठी इसमाचे अपहरण करणार्या सहा जणांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः जेसीबी घेण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये परत देत नव्हता. तसेच सदर वाहन सुद्धा देत नसल्याने रागाच्या भरात सहा जणांनी पनवेल येथून एका इसमाचे अपहरण केले. परंतु या संदर्भात तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात सदर सहा आरोपींची माहिती घेवून अपहरण केलेल्या इसमाला सुखरुपपणे शोधून काढले आहे.
ज्ञानेश्वर जाधव (30 रा.औरंगाबाद) व त्याचा सहकारी अपहरण झालेला रवि नांगडे (30 रा.औरंगाबाद) यांनी आमच्याकडे पनवेल येथे विकण्यासाठी जेसीबी पोकलन असल्याचे बीड येथील काही जणांना सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून सदर जेेसीबी व पोकलन घेण्यासाठी 2 लाख रुपये आगावू रक्कम घेतली. त्यानंतर बीड येथील या व्यक्तीने सदर वस्तू कधी देतो यासाठी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता या दोघांनी वेळकाढू पणाचे धोरण अवलंबविले. अखेरीस त्यांना पनवेल येथून बोलावून अपहरण झालेला रवि नांगडे यांनी त्या सहा व्यक्तींना पनवेल शहरात ठिकठिकाणी फिरविले परंतु वस्तू देण्यास टाळाटाळ केल्याने अखेरीस त्रस्त झालेल्या या सहा व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये त्याला घालून पुणे बाजूकडे त्याला घेवून गेले व त्याचा सहकारी ज्ञानेश्वर जाधव याला फोन करून आमचे पैसे 2 लाख रुपये आणून दे व तुझ्या सहकार्याला घेेवून जा असे सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर जाधव यांनी तात्काळ आपल्या सहकार्याचे अपहरण झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी, पो.उप.निरीक्षक अभय शिंदे, पो.हवा.रवींद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना वायकर, पोना पारासूर, पोना देशमुख, पो.ना.संजय सावंत, विवेक पारासुर, गथंडे आदींच्या पथकाला तांत्रिक तपासाद्वारे व गुप्त बातमीदाराद्वारे सदर इसमाला तळेगाव दाभाडे परिसरात घेवून गेल्याची त्यांना माहिती मिळाल्याने त्यानुसार सदर पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून या सहा जणांना ताब्यात घेवून अपहरणकर्त्याची सुटका केली आहे व त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 365, 384 आदींसह इतर कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
फोटो ः अपहरण केलेली स्कॉर्पिओ गाडी