अग्नीशस्त्राची विक्री करण्यास आलेल्या दोन इसमांना कामोठे पोलीसांकडुन अटक..
अग्नीशस्त्राची विक्री करण्यास आलेल्या दोन इसमांना कामोठे पोलीसांकडुन अटक
पनवेल, दि.23 (संजय कदम) ः अग्नीशस्त्राची विक्री करण्यास आलेल्या दोघा इसमांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी घटना टळली आहे.
कामोठे पोलीस ठाणे हद्दीत किया शोरुमजवळ, खांदा कॉलनी सिग्नल समोर, कामोठे, नवी मुंबई याठिकाणी अँक्टीव्हा स्कुटीवर 21 ते 22 वर्ष वयोगटातील दोन इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता जाधव यांना प्राप्त झाल्याने त्यांनी कामोठे पोलीस ठाणेकडील पोउपनि कोठावळे, पोना कांबळे, पोशि चनेरलु व पोशि श्रीनामे व सोबत पंच असे पथकासह लागलीच नमुद ठिकाणी सापळा लावला असता संशयित आरोपी विश्‍वजीत गडदे (21 रा.कामोठे) व आझाद हुसेन मोहम्मद समीम (22 रा.सुकापूर) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरुन तेथे आले असता त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल) व मोबाईल फोन तसेच रोख रक्कम सापडली आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर अग्नीशस्त्रे कोणाकडून आणली या संदर्भात कामोठे पोलीस अधिक शोध घेत आहेत.
फोटो ः अग्नीशस्त्राची माहिती देताना पोलीस अधिकारी वर्ग (छाया ः संजय कदम)
Comments