नवीन पनवेलमध्ये धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ; पनवेल महानगरपालिकेचा मोठा निर्णय
पनवेल महानगरपालिकेचा मोठा निर्णय ..
पनवेल(प्रतिनिधी)  सिडकोने बांधलेल्या नवीन पनवेल मधील इमारतींची अवस्था बिकट झाल्याने त्या इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीला यश आले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्या सोबतीने या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने आदेश दिले आहेत, त्यामुळे सिडकोच्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः प्रथमच असा निर्णय महापालिकेने घेतला असल्याने रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला असून पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. 
        या संदर्भात महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आदेश दिले असून आदेशाची प्रत देण्यात आली. यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक बबन मुकादम आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 नवीन पनवेल वसाहतीत बांधण्यात आलेल्या सिडको इमारतींच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. इमारती जीर्ण झाल्याने स्लॅब कोसळण्यापासून तर प्लास्टर निघणे यासारख्या असंख्य घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवीन पनवेल मधील सेक्टर १७ मधील पीएल ६ अपार्टमेंट असोसिएशन बिल्डिंग क्रमांक ०९ ते १५ आणि २१ ते २३ या १० रहिवासी इमारती धोकादायक झाल्याने या इमारतींचा विकास करणे अत्यंत गरजेचे होते. सिडको सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करणे महत्वपूर्ण होते. त्यामुळे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली पाठपुरावा केला. त्यानुसार या धोकादायक इमारतींची पाहणी करून प्रस्ताव तयार करण्यात आला. सदर प्रस्तावासोबत संरचना अभियंता यांचा अहवाल सादर झाला. अहवालानुसार एकूण या १० इमारती (एकूण १२० सदनिका) संरचनात्मकदृष्टया धोकादायकअसून त्या डागडुगी किंवा दुरुस्ती करण्याच्या पलीकडे असल्याने व त्या मानवी वास्तव्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत आणि तसे आदेश त्यांनी पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे सिडकोच्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असून हा एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे.  याकामी मार्गदर्शन केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, तसेच आयुक्त गणेश देशमुख, पाठपुरावा केल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक अनिल भगत आणि सहकाऱ्यांचे रहिवाशांनी आभार व्यक्त केले.
Comments