मेट्रो प्रकल्पातील तळोजे किंवा पेंधर या मेट्रो सेंटरला सद्गुरू वामनबाबा महाराज यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.3 (संजय कदम)- पनवेल जवळ होत असलेल्या मेट्रो प्रकल्पातील तळोजे किंवा पेंधर या मेट्रो सेंटरला सद्गुरू वामनबाबा महाराज यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात बबनदादा पाटील यांनी म्हटले आहे की, मेट्रो प्रकल्पाचे काम पुर्ण होत आले असून या संपूर्ण प्रकल्पात जवळपास 20 मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नवी मुंबईच्या विकासात ज्या प्रमाणे सिडको महामंडळाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे रायगड व ठाणे जिल्ह्यात वारकरी संप्रदायाची आधारशिला सद्गुरू वामनबाबा महाराज यांनी रचली. 1960 च्या दशकात सद्गुरू वामनबाबा महाराज पनवेल तालुक्यातील तळोजे मजकूर येथे स्थायिक झाले. तेव्हापासून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचाराचा झंझावात अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवला. महाराजांच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात तंटामुक्ती तसेच व्यसनमुक्तीचे कार्य अविरत चालत राहिले. म्हणूनच सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून पनवेल जवळ होत असलेल्या मेट्रो प्रकल्पातील तळोजे किंवा पेंधर या मेट्रो सेंटरला त्यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
फोटोः बबन पाटील