प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा पनवेल तालुका पोलिसांकडून हस्तगत
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः मानवी आरोग्यास अपायकारक व शरिरास घातक असा प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या दोघा जणांनी जवळ बाळगला म्हणून पनवेल तालुका पोलिसांनी अजिवली गाव परिसरातून त्यांना ताब्यात घेतले असून यासाठी ते वापरत असलेले होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ही मोटार सायकल सुद्धा ताब्यात घेतली आहे.
अशा प्रकारचा तंबाखू व पान मसाला जवळ बाळगत असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनश्री पवार व पो.शि.सतीश दराडे व पथकाने त्रिमुर्ती पेट्रोल पंपासमोर जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील अजिवली गाव येथे छापा टाकून दिनेश राम जतन मोरया (22) व राजेश फुलचंद चौरसिया (37) या दोघांना मोटार सायकलीसह ताब्यात घेवून त्यांच्याकडून 25 हजार 987 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 188 , 273, 328, 34 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26 (2) (आयव्ही), 27 (2) (ई), 59 (2) अंतर्गत कारवाई केली आहे.