नववर्ष स्वागत कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या भरारी पथकांची जोरदार कारवाई..



नववर्ष स्वागत कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या भरारी पथकांची जोरदार कारवाई

आयुक्त गणेश देशमुख कारवाईसाठी उतरले रस्त्यांवर
पनवेल,दि.1 : राज्यासह पालिका क्षेत्रात कोराना रूग्ण संख्या वाढू लागल्याने शासनाने पुन्हा कठोर निर्बंध लागू गेले आहेत. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच विना मास्क फिरणाऱ्या आणि रात्री 9 नंतर जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर,  कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाबरोबर आयुक्त गणेश देशमुख यांनी स्वत: रस्त्यांवर उतरले होते. त्यांच्याबरोबर उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवेही होत्या. महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे,पनवेल, अशा चारही प्रभागात आयुक्तांनी स्वतः जाऊन दंडात्मक कारवाई केली.

यावेळी ठरवून दिलेल्या आसनक्षमते पेक्षा जास्त गर्दी असलेल्या आस्थापना,तसेच ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर पालिकेच्या भरारी पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या आणि मुखपट्टीचा वापर करीत नसलेल्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम मर्यादित प्रमाणात करण्याच्या सूचना आयुक्तांनी 29 डिसेंबरला झालेल्या बैठकित दिल्या होत्या. सध्या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. तसेच राज्य शासनानच्या नव्या निर्देशानुसार विवाह सोहळ्याबरेाबरच कोणत्याही सभारंभात फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. 


नववर्षानिमित्त हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 50 अधिकारी- कर्मचाऱ्यांची भरारी पथके गेल्या दोन तीन दिवसापासून तैनात करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

 हुल्लडबाजी करणाऱ्यांवर या पथकाची करडी नजर ठेवून होते. शहरातील मोकळ्या जागी तसेच सार्वजनिक ठिकाणीही या पथकांमार्फत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर प्रमुख ठिकाणांसह बाजारपेठ परिसरात रात्री ९ वाजेनंतर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिकेच्या भरारी पथकाने घेतली.

गेल्या तीन दिवसांपासूनची दंडाची रक्कम
अ,ब,क,ड चारही प्रभागातील एकत्रित दंड

29 डिसेंबर - 95 हजार रूपये
30 डिसेंबर -1 लाख 87 हजार रूपये
31 डिसेंबर- २ लाख५२ हजार ७०० रूपये
Comments