अर्थ फाउंडेशनच्या वतीने नाटीकेद्वारे लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश
पनवेल / वार्ताहर : - "मर्द को भी दर्द होता है" या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालत लैंगिक समानतेचा संदेश देण्यात अर्थ फाऊंडेशनच्या सदस्यांना चांगलेच यश मिळाल्याचे दिसून येत होते.
याबाबत अधिक माहिती देताना अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघ यांनी शाश्वत विकास ध्येय डोळ्यापुढे ठेवली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वच सदस्यांनी 2030 पर्यंत ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून कार्य करण्याचे एकमताने मंजूर केले आहे. 1 जानेवारी 2016 पासून संयुक्त राष्ट्र संघातील सगळे सदस्य शाश्वत विकास उद्दिष्टांवर काम करत आहेत. यामध्ये लैंगिक समानता, सामाजिक न्याय, शांतता, सशक्त राष्ट्र निर्मिती यासारख्या शश्वत उद्दिष्ट द्वारे सुदृढ समाज व्यवस्था बनविण्याचे ध्येय्य डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहेत. आमच्या संस्थेने आज "मर्द को दर्द होता है" ही प्रायोगिक नाटिका सादर करून स्त्री-पुरुष यांच्यातील भेदाभेद नष्ट करण्याचा एक छोटेखानी प्रयत्न केला आहे.
अत्यंत आशय घन पद्धतीने विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केल्यामुळे रविवारच्या संध्याकाळी शॉपिंग साठी आलेल्या नागरिकांनी काही मिनिटे थांबून या सादरीकरणाचा आनंद लुटला. नाटिका पाहून घरी जाताना प्रत्येकाच्या डोक्यात लैंगिक समानतेचा विषय रुंजी घालत असेल आणि हेच आमच्या उपक्रमाचे फलित असल्याचे प्रवीण कलमे यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यांच्यासोबत संस्थेच्या सी ई ओ प्रविणा कलमे, ग्लोबल ॲम्बेसेडर प्रथम कलमे, सी एम ओ हेतल वाघ, सदस्य कृषीका शिरिशकर, इव्हेंट मॅनेजर विलास भोसले यांनी अथक परिश्रम घेतले.