१० वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड..
१० वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः  कळंबोली - खारघर परिसरात रिक्षा चालविणाऱ्या एका 23 वर्षीय नराधमाने कळंबोली भागात रहाणाऱ्या 10 वर्षीय मुलीला व तिच्या दोन भावांना चिकन खाण्यास देण्याच्या बहाण्याने रिक्षातून खारघर परिसरात नेऊन, पीडित मुलीवर गॅरेजमधील कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश चंद्रभुषण बिसुकर्मा (23) असे या नराधमाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याला बलात्कारासह पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.  
या घटनेतील 10 वर्षीय पीडित मुलगी कळंबोली परिसरात रहाण्यास असून गत 26 डिसेंबर रोजी सायंकाळी ती आपल्या दोघा भावंडासह कळंबोलीतील डी-मार्ट समोर भरलेल्या मेळ्यामध्ये फिरण्यासाठी गेली होती. आरोपी चंद्रभुषण हा देखील रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या भागात रिक्षा घेऊन गेला होता. यावेळी पीडित मुलगी व तिच्या भावंडासोबत कुणीही मोठी व्यक्ती नसल्याचे पाहून आरोपी प्रकाश बिसुकर्मा याने पीडित मुलगी व तिच्या भावंडाना चिकन खाण्यास देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिघांना आपल्या रिक्षामध्ये बसवून खारघरमध्ये नेले. त्यानंतर त्याने तिन्ही मुलांना आपल्या कारमध्ये बसवून काही अंतर नेऊन पीडित मुलीच्या दोन्ही भावांना कारमधून खाली उतरवून पीडित मुलीला आपल्यासोबत एका गॅरेजमध्ये नेले.  
त्यानंतर त्याने पीडित मुलीला मारहाण करुन तिच्यावर कारमध्येच लैंगिक अत्याचार करुन तिला त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. यावेळी पीडित मुलीच्या भावांनी कसेबसे कळंबोली येथील घर गाठून रिक्षा चालकाने त्यांच्या बहिणीला पळवून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर दुसरीकडे पीडित मुलीने एका रिक्षा चालकाची मदत घेऊन खारघर पोलीस ठाणे गाठून त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर खारघर पोलिसांनी कळंबोली पोलिसांशी संपर्क साधून पीडित मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कळंबोली पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरुन खारघर मधील गॅरेजमध्ये जाऊन, आरोपी चंद्रभुषण याची कार ताब्यात घेऊन त्याला देखील अटक केली.
Comments