फ्लॅटच्या बुकींगसाठी लाखो रुपये उकळून निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याची फसवणूक...
फ्लॅटच्या बुकींगसाठी लाखो रुपये उकळून निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याची फसवणूक...

पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः इमारत उभारण्याचे आणि त्यातील दोन फ्लॅट विकत देण्याचे आश्‍वासन देऊन रेल्वेतून सेवानृत्त झालेल्या व्यक्तीकडून तब्बल 22 लाख 44 हजार रुपयांची रक्कम उकळून गत 6 वर्षात इमारतीचे बांधकाम न करता रेल्वे कर्मचार्‍याची फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाविरोधात नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सदर प्रकरणातील तक्रारदार आसिफ मेहबूब शेख (62) खारघर येथील ओवे गाव येथे राहण्यास असून ते 2019 मध्ये रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. शेख यांचे स्वत:चे घर नसल्याने 2015 मध्ये त्यांनी घर विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यावेळी बेलापूर गांव, सेक्टर-20 भागात इमारतीचे बांधकाम करणार्‍या एस.ए. बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे विकासक अकबर हुसेन चौगुले याच्यासोबत शेख यांची ओळख झाली होती. त्यावेळी चौगुले याने बेलापूर मधील शहाबाज गांव येथे इमारतीचे बांधकाम करत असल्याचे सांगून तेथील प्लॉटची कागदपत्रे दाखविली होती. त्यावेळी चौगुले याने दोन वर्षात रुमचा ताबा देण्याचे आश्‍वासन शेख यांना दिले होते. त्यामुळे शेख यांनी सदर इमारतीतील फ्लॅट विकत घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर चौगुले याने त्यांना 619 आणि 790 क्षेत्रफळाचे दोन फ्लॅट 32 लाख रुपयांमध्ये विकत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर शेख यांनी 3 लाख रुपयांची रोख तर उर्वरीत 19 लाख 44 हजार रुपये रोख आणि चेक स्वरुपात चौगुले याला दिले होते. त्यानंतर चौगुले याने दोन फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा करारनामा देखील केला होता. तसेच रुमचा ताबा दिल्यानंतर बाकीच्या रक्कमेचे लोन करुन देण्याचे आश्‍वासन देखील शेख यांना दिले होते. मात्र, त्यानंतर शेख याने बांधकाम सुरुच केले नाही. त्यामुळे त्यांनी चौगुले याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता, त्याने वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेली. मात्र, त्यानंतर देखील त्याने बांधकाम सुरु केले नाही. त्यामुळे शेख यांनी त्याच्याकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर सहा महिन्यात त्यांना पैसे परत देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरही त्याने शेख यांना पैसे देण्यास टाळाटाळ करुन उडवा- उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने नेरुळच्या सेंच्युरियन मॉल मधील आपले कार्यालय देखील बंद करुन पलायन केले. अशा पध्दतीने चौगुले याने फसवणूक केल्यानंतर शेख यांनी त्याच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरुन नेरुळ पोलिसांनी विकासक अकबर चौगुले याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments