जबरी चोरीसह मंगळसूत्र खेचून पसार होणार्‍या सराईत गुन्हेगारास खांदेश्‍वर पोलिसांनी केले गजाआड..
जबरी चोरीसह मंगळसूत्र खेचून पसार होणार्‍या सराईत गुन्हेगारास खांदेश्‍वर पोलिसांनी केले गजाआड ; जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत..
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः पायी चालत जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन, जबरी चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास खांदेश्‍वर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून आतापर्यंत चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सोन्याचे दागिने व मोटार मिळून जवळपास 2 लाख 8 हजार 888 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून खांदेश्‍वर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोेन्याचे दागिने खेचून पसार होण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल शिवराज पाटील व सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी केलेल्या वेळोवेळी सुचनेनुसार खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वपोनि सुभाष कोकाटे, पो.नि.गुन्हे श्रीमती.वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनानुसार पो.उपनिरीक्षक निलेश पोळ, पो.हवा.सारंग, पो.ना.घोसाळकर, पो.शि.युवराज शिवगुडे, पो.शि.संभाजी गाढे, पो.शि.सचिन सरगर आदींच्या पथकाने सदर गुन्हेगारांचा अधिक शोध घेत असताना त्यांना आरोपी धिरज पाटील (21 रा.अंबिवली) याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याने आतापर्यंत 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली मोटार सायकल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील चेन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Comments