ओवे डोंगरावर पुन्हा वणवा ; शेकडो झाडे जळून खाक...
ओवे डोंगरावर पुन्हा वणवा; शेकडो झाडे जळून खाक...
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल जवळील खारघर येथील ओवे डोंगरावर मोठ्या प्रमाणात वणवा पेटला. या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा खाक झाली असून, वन्यप्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. डोंगरावर पर्यटकांच्या नावाखाली येणार्‍या मद्यपींकडून वणवा पेटविला जात असल्यामुळे वनविभाग कर्मचारी हतबल झाले आहेत.
खारघर सेक्टर-34, तळोजा मध्यवर्ती कारागृह ते तळोजा तलाव लगत असलेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वनसंपदा आस्तत्वात आहे. गेल्या 5-7 वर्षांत महाराष्ट्र राज्य सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात ओवे डोंगरावर वृक्षारोपण केले आहे. मात्र, या वनसंपदेचे संवर्धन होण्याऐवजी दरवर्षी हिवाळ्यात लागणारा वणवा आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आग लागण्याच्या घटना समोर येत असतात. चालू नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात खारघर सेक्टर- 34 लगत असलेल्या डोंगरावर वणवा लागला होता. यावेळी काही झाडे जळून खाक झाली होती. त्यावेळी रात्री काही पर्यावरण प्रेमींनी आग आटोक्यात आणली होती. सिडको जलकुंभ शेजारील डोंगरावर वणवा लागला. या वेळी अ‍ॅड. जे. पी. खारगे, प्रितपाल सिंग आणि इतर काही व्यक्तींनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान, वन विभागाला वणवा लागल्याची माहिती मिळताच वनविभाग कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री नऊ वाजताच्या सुमारास वणवा विझविला. खारघर मधील डोंगरावर दिवाळी नंतर लागणार्‍या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी होत असते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केली आहे. खारघर आणि ओवे डोंगर परिसरातील वनसंपदा नष्ट होवू नये म्हणून डोंगरलगत असलेल्या आदिवासी पाड्यात सभा घेवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. त्यामुळे ग्रामस्थांकडून सहकार्य देखील मिळते. मात्र, निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगरावर दरदिवशी अनेक पर्यटक येतात. काही लोक पर्यटकांच्या नावाखाली दारु पार्टी करताना सिगारेट पिऊन सिगारेट विझविण्याऐवजी फेवून पसार होतात. सदर प्रकार संध्याकाळी होतात. त्यामुळे आग विझविण्यात मोठी अडचण निर्माण होते. नागरिकांनी डोंगरावर आग न लावता वनसंपदा सुरक्षित राहावी यासाठी वन विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे, असे वन विभाग कर्मचार्‍यांनी सांगितले.
फोटो ः लागलेला वणवा
Comments