रूम स्वस्तात मिळेल असे सांगून २ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक..
रूम स्वस्तात मिळेल असे सांगून केली २ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः बिल्डिंग बांधण्यासाठी बांधकाम विभागाच्या परवानगी असल्याचे खोटे सांगून आणि रूम लवकरात लवकर बुक केल्यावर तूम्हाला स्वस्तात मिळेल असे सांगून दोन लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
लालबाग, मुंबई येथील विठ्ठल दिगंबर गवंडळकर हे 2011 मध्ये स्वामी समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचे बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयात गेले. यावेळी दीपक शिंदे आणि अनिल बापेरकर यांनी विचुंबे गाव येथे नवीन बांधकाम साईट चालू असल्याचे सांगितले. यावेळी दोन वर्षात ताबा देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वन बीएचके रूम घेण्याचे ठरले. यावेळी सर्व विभागांच्या बांधकाम परवानगी घेतली असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. व प्रोजेक्टमध्ये तुम्ही आत्ता बुक केले तर ते स्वस्तात मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे दीपक शिंदे व अनिल बापेरकर यांना दोन लाख 80 हजार रुपये चेक स्वरूपात देण्यात आले. दोन वर्षात त्यांनी इमारतीचे 3 स्लॅबचे बांधकाम केले. मात्र बांधकाम पूर्ण केले नाही. त्यावेळी विचारणा केली असता लवकरच बांधकाम पूर्ण होईल असे आश्‍वासन देण्यात आले. सात वर्ष पूर्ण झाली तरीदेखील इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने त्यांनी भरलेले पैसे परत मागितले. यावेळी त्यांनी चेक दिले, मात्र ते चेक बाउन्स झाले. गुंतवलेले पैसे परत कधी मिळणार याबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे स्वामी समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचे प्रोप्रायटर दीपक शिंदे व अनिल बापेरकर यांच्या विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments