गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीच असे 140 किलोमीटरचे अंतर शुभम पोहून करणार पार..
गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीच असे 140 किलोमीटरचे अंतर शुभम पोहून करणार पार 
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपट्टू आणि शिवछत्रपती अवॉर्ड शुभम धनंजय वनमाळी 17 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 यादरम्यान गेटवे ऑफ इंडिया, मुंबई ते डहाणू बीच, जिल्हा - पालघर हे 140 किलोमीटरचे अंतर पोहन पार करणार आहे. 

या स्विमची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार असून त्याची सांगता डहाणू बीच येथे 20 डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे. या स्वीमसाठी सुबोध सुळे संचलालक आणि दिलीप कोळी नावाडी तथा दिशादर्शक म्हणून काम पाहणार आहेत.  
यापूर्वी शुभम वनमाळी याने जगातील प्रसिध्द इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्लिम, राजभवन वाळकेश्‍वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम  केलेले आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमतेच्या जागरुकतेसाठी करीत आहे. 
या स्विमचे वैशिष्ट असे आहे की, अशा प्रकारचं आगळं वेगळं स्विम भारतामध्ये प्रथमच होत आहे. तसेच 140 किलोमीटर पोहणारा शुभम हा भारतामधील पहिला जलतरपट्टू असणार आहे. हे स्विम शुभम आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी  विशेष असणार असून त्यांचे मूळ गाव डहाणू तालुक्यातील वरोर हे आहे. त्याच प्रमाणे शुभमचे वडील व आजोबांची कर्मभूमी याच तालुक्यातील कासा आहे. शुभम सध्या डोंबिवलीनजीक असलेल्या पलावा लेकशोअर येथे माजी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपट्टू रुपाली रेपाळे आणि माजी राष्ट्रीय जलतरपट्टू अनिरुध्द महाडिक, एन.आय.एस. प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
Comments