कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने ५० हजाराची केली फसवणूक...
पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या एका भामट्याने 25 हजार रुपये किंमतीचे 50 ड्रेस घेवून पैसे न देता तो पसार झाल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
मोनिका सदानी यांचे खारघर वसाहतीमध्ये एम.एफ.सी हे ब्युटीक असून या ठिकाणी एक भामटा दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. घरी पाहुणे आले असून त्यांना कपडे पाहिजेत असे सांगून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे काढायला सांगितले व त्यातील 50 ड्रेस निवडून बिल बनविण्यास सांगितले. त्यानुसार मोनिका यांनी 25 हजाराचे बिल बनवून त्यांच्याकडे कामाला असलेल्या इसमाकडे दिले. कपडे दिल्यानंतर सदर भामट्याने त्या इसमाला पैसे देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या बाहेर नेले. त्यानंतर त्याच्याकडून कपडे घेवून त्याला पैसे न देता रिक्षामधून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोनिका सदानी यांनी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.