अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या ४ तासाच्या आत करण्यात आली सुटका....
अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या  ४ तासाच्या आत करण्यात आली सुटका....
पनवेल,  / दि. 24  (संजय कदम) ः एका 6 वर्षीय मुलाची त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केले होते. परंतु खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या 4 तासात सदर मुलाला मुंबई सेेंट्रल रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेवून अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली आहे. यावेळी त्या मुलाच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. 
तक्रारदार विनय गामा सिंग, वय 39 वर्षे, रा. विचूंबे, यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची पत्नी सौ. पिंकी सिंग यांचे मोबाईलवर अज्ञात इसमाने सायंकाळी फोन करून व एसएमएसव्दारे धमकी दिली की, त्यांचा मुलगा यश, वय 6 वर्षे (नाव बदललेले आहे.) हा व त्यांची भाची महिला (21) हे आमच्या ताब्यात असून दहा लाख रूपये घेवून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे या, अन्यथा दोघांनाही ठार करू. तक्रारदार या दिलेल्या तकारीवरुन खांदेश्‍वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन  पोलीस आयुक्त, नवी मुंबई, बिपिनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त, डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सुरेश मेंगडे. पोलीस आयुक्त परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त, भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास सोनवणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, डी.डी. ढाकणे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण पांडे, पो.उप निरी. निलेश पोळ, किरण वाघ, पो.हवा./सुदर्शन सारंग, महेश कांबळे, पो.ना./विशाल घोसाळकर, चेतन घोरपडे, पो.शि./सचिन सरगर, संभाजी गाडे, पनवेल शहर पोलीस ठाणेचे स.पो.निरी. दळवी व पथक, तळोजा पो.ठाणेचे स.पो.निरी. रोकडे, जाधव व पथक, कळंबोली पो. ठाण्याचे पो.उपनिरी. बच्छाव व पथक, गुन्हे शाखा युनिट 2 चे पो.उपनिरी. वैभव रोंगे पोना/प्रविण पाटील व पथक अधिक शोध घेत असताना मोबाईल फोनद्वारे तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेज याचा आधार घेवून ती सर्व पथके बांद्रा टर्मिनल येथे रवाना झाली. यावेळी सखोल तपास केला असता त्यांनी आरोपी विपीन हिरालाल अग्रहरी (21) याला ताब्यात घेतले व सदर मुलाची माहिती विचारली असता त्यांनी सदर मुलगा व त्याच्या सोबत असलेली महिला पुढे आली असता पोलीस पथक सुद्धा चक्रावून गेले. कारण विपीन अग्रहरी यानेच सहा महिन्यापूर्वी जिच्या बरोबर लग्न केले होते तीनेच आपल्या मामाच्या मुलाचे अपहरण केले होते. अधिक चौकशीमध्ये त्या दोघांच्या लग्नाला मामाचा विरोध होता. यामुळे मामाला धडा शिकविण्यासाठी त्यांनी मामाच्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडे 10 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. पोलिसांना थोडा तरी वेळ झाला असता तर ते दोघेजण या मुलाला घेवून उत्तरप्रदेशला पळून जाणार होते. या कट त्यांनी उत्तरप्रदेशला सुल्तानपुर येथे रचला होता. त्यानुसार सदर तरुणी ही मामाकडे राहण्यास आली होती व त्यानंतर त्या दोघांनी सुनियोजितपणे या भाचाला घेवून ते पळून जाणार होते. परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे व सखोल तपासामुळे यांचा कट उघडकीस आला. याकामी रेल्वे पोलिसांची सुद्धा महत्वाची भूमिका राहिली आहे. 

फोटो ः आरोपीसह वपोनि देवीदास सोनवणे व त्यांचे पथक
Comments