स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांची अनेक सुविधांपासून गैरसोय ; शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र.....
स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांची अनेक सुविधांपासून गैरसोय ; शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र.....
पनवेल, दि.21 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात नाही. स्वच्छता दूतांना मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.          
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात. त्यांच्यामुळे पनवेल महानगराचे आरोग्य अबाधित राहते. कोरोना वैश्विक संकटामध्ये त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छता विषयक कामे केली. ते खऱ्या अर्थाने कोविड योध्दे आहेत. असे असताना मनपा क्षेत्रातील स्वच्छता दूतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत गणवेश दिला जात नाही. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर साधनांचाही अभाव दिसून येतो. अनेकदा गणवेश नसल्याने संबंधिताचे कामाचे खाडे केले जातात. वास्तविक पाहता ती कपात महापालिकेकडून केली जाते का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. रस्त्यावर स्वच्छता करत असताना लांब दांडे असलेले झाडू संबंधितांना पुरवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना उभे राहात रस्त्यावरही स्वच्छता करता येईल. मात्र त्यांच्याकडे अशा प्रकारचे झाडू दिसत नाहीत. त्याचबरोबर इतर साधनांचा अभाव आहे. रात्रीच्या वेळी होणारी स्वीपिंग ही धोकादायक आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात तेथे संबंधित ठेकेदाराचे साईड ऑफिस असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात हे ऑफिस हे साईनगर या ठिकाणी असल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी स्वखर्चाने जावे लागते. अनेकांना कार्यालय कुठे आहे याचीच माहिती नाही. या व्यतिरिक्त स्वच्छता दुतांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सार्वजनिक शौचालय सुद्धा कामाच्या ठिकाणी आढळून येत नाहीत. त्यामुळे त्यांची कुचंबना होते. महिला कर्मचाऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वच्छताविषयक कर्मचाऱ्यांसाठी एक रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना सगळे सुरक्षितेचे साधने संबंधित ठेकेदाराने पुरवणे क्रमप्राप्त आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे रामदास शेवाळे यांनी महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत  योग्य ती कार्यवाही करावी. नेमलेला एजन्सीला योग्य ते निर्देश द्यावेत अशी मागणी शेवाळे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.

कोट :
स्वच्छता दुतांमुळे आपले आरोग्य अबाधित राहते. त्यांच्यामुळे शहर स्वच्छ राहून रोगराई निर्माण होत नाही. परंतु त्यांच्याकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जाते. ठेकेदाराकडून त्यांना साधने पुरवले जात  नाहीत. मूलभूत सुविधांचाही वानवा आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुविधेत कडे पाहणे आवश्यक आहे. मात्र महापालिका आणि ठेकेदाराकडून तसे केले जात नाही. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
रामदास शेवाळे, महानगरप्रमुख पनवेल .                       

फोटो- रामदास शेवाळे
Comments