ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दारुची बाटली फोडणारे दोघे तरुण अटकेत...
पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः नेरुळ येथील गावदेवी मंदिराच्या आवारात दारु पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना हटकणाऱया 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यावर दोघा तरुणांनी दारुची बाटली फोडून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. या हल्ल्यात सदर ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी दोघा हल्लेखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
या घटनेत जखमी झालेले नारायण गणु पाटील (72) हे ज्येष्ठ नागरिक नेरुळ गावात कुटुंबासह राहण्यास असून ते नेरुळ मधील गावदेवी मंदिराचे विश्वस्त आहेत. पाटील हे दररोज सायंकाळी देवीची आरती करण्यासाठी जात असतात. ते गावदेवी मंदिरात आरतीसाठी गेले होते. मात्र ते जाण्यापुर्वीच आरती झाल्याने काहीकाळ मंदिरात थांबुन ते रात्री 8.30 च्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी मंदिराच्या आवारात बाथरूम जवळ नारायण पाटील यांच्या ओळखीतील तरुण रतिन मदन आचार्य (23) व त्याचा साथीदार पियुष पाटील (21) हे दोघे तरुण दारु पित बसल्याचे नारायण पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाटील यांनी दोघांना हटकुन त्यांना मंदिर आवारात दारु न पिण्याबाबत समज दिली. या गोष्टीचा त्यांना राग आल्याने पियुष पाटील याने त्यांना शिवीगाळ केली, तर रतिन आचार्य याने नारायण पाटील यांचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर पियुष पाटील याने नारायण पाटील यांच्या डोक्यात दारुची काचेची बाटली फोडली. त्यामुळे नारायण पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले. त्यानंतर दोघा हल्लेखोर तरुणांनी त्याठिकाणावरुन पलायन केले. यावेळी त्या भागात असलेल्या नागरिकांनी जखमी नारायण पाटील यांना तत्काळ मिनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱया दिवशी नारायण पाटील यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रतिन आचार्य व पियुष पाटील या दोघांवर कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करुन शनिवारी दोघांना अटक केली.