महापालिकेने आर्थिक क्षमतेनुसार लघु निविदा काढाव्यात ; भरत पाटील पनवेल तालुका संघटक....
पनवेल / वार्ताहर :- पनवेल महानगरपालिका अंतर्गत अनेक विकासकामे सुरू असून या सार्वजनिक कामामध्ये अवाढव्य रकमेची एकत्रित निविदा न काढता आर्थिक क्षमतेनुसार लघु निविदा काढण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या मंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अथवा प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना शासकीय कामे मिळत नाहीत. सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सिडको अंतर्गत विभागातील नागरी सुविधा हस्तांतरीत केल्यामुळे ई-टेंंडर पद्धतीने साफसफाई, गार्डन, रस्ते, फुटपाथ नुतनीकरण व देखभाल या कामांसाठी मोठ्या रकमेच्या निविदा एकत्रित काढल्या जात आहेत. या कामांच्या निविदा भरण्यास सर्वसामान्य ठेकेदार नाखुश असून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे काम महानगरपालिका क्षेत्रात मिळणे कठीण झाले आहे. या कामांमध्ये खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल भागातील अनेक सेक्टरमधील विकासकामांचे एकत्रित मुल्यांकन करून संपूर्ण मोठ्या रकमेचे टेंडर काढण्यात येते. या एकत्रित कामांच्या निविदेसाठी सर्वसामान्य ठेकेदार पात्र होत नसल्याने सदर एकत्रित कामांच्या निविदेचा फायदा बाहेरचे मोठे ठेकेदार यांना होत असतो. त्यामुळे ई-टेंडर पद्धतीबरोबरच जुन्या कार्यपद्धतीनुसार ऑफलाईन टेंडर पद्धत अंमलात आणल्यास महापालिका क्षेत्रातील निधीचा वापर हा पारदर्शकरित्या होवून स्थानिक प्रकल्पग्रस्त शासनमान्यता प्राप्त ठेकेदारांना याचा उपयोग होवू शकतो, अशी मागणी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.