गुंतवणुकिवर चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून माजी सैनिकाला 47 लाख 65 हजारांना गंडा...
गुंतवणुकिवर चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून माजी सैनिकाला 47 लाख 65 हजारांना गंडा...

माजी सैनिकाला त्रिकुटाने घातला 47 लाख 65 हजारांना गंडा, फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाचा पोलिसांकडून शोध सुरु  

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः गुंतवणुकिवर चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून एका त्रिकुटाने भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या एका सैनिकाला व्हेल पॅक पॉली ट्रेडर्स कंपनीत पैसे गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची तब्बल 47 लाख 65 हजार रुपयांची फसवणुक केल्याची घटना उघडकिस आले आहे. राजेंद्र सिंग, पवन अग्रवाल व मोनिका अग्रवाल असे या त्रिकुटाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी या तिघां विरोधात फसवणुकिसह अपहाराचा ग्न्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  
या प्रकरणात फसवणुक झालेले बलवीर रामनिवास सिंह सिकरवार (40) हे मध्यप्रदेशमध्ये रहाण्यास असून ते ऑगस्ट 2017 मध्ये भारतीय नौदलातुन निवृत्त झाले आहेत. बलवीर यांच्या सोबत भारतीय नौदलात असलेले व सध्या खारघर येथे रहाणारे राजेंद्र सिंग यांच्यासोबत बलवीर यांची त्यावेळी ओळख झाली होती. या ओळखीनंतर राजेंद्र सिंग यांनी डिसेंबर 2019 मध्ये बलबीर यांना सीबीडी बेलापुर येथे बोलावून त्यांना निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम पवन अग्रवाल व मोनिका अग्रवाल यांच्या व्हेन पॅक पॉली ट्रेडर्स या कंपनीत गुंतवणुक करण्याचे सुचविले होते. सदर कंपनी साखरेच्या फ्लॅस्टीक बॅग बनवित असून या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे आश्‍वासन त्यांना राजेंद्र सिंग याने त्यावेळी दिले होते. तसेच त्यांनी स्वत: देखील सदर कंपनीत पैसे गुंतविल्याचे बलबीर यांना सांगितले होते.  सदर कंपनीत 9 लाख रुपये गुंतवल्यास त्यांना प्रत्येक महिन्याला 87,500 रुपये परतावा मिळेल, तसेच सदर रक्कम त्यांना देता न आल्यास 87500 रुपयांवर महिना 15 टक्के व्याज अग्रवाल याची कंपनी मा वर्धीनी फॅसिलीटीजकडून देण्यात येईल असे आश्‍वासन बलबीर यांना देण्यात आले होते. त्यानुसार बलबीर यांच्यासोबत कंपनीच्या वतीने करारनामा देखील करण्यात आला होता. त्यामुळे बलबीर यांनी राजेंद्र सिंग यांच्यावर विश्‍वास ठेवून सदर कंपनीमध्ये सुरुवातीला काही लाखाची रक्कम गुंतविली. त्यावेळी राजेंद्र सिंग व अग्रवाल दाम्पत्याने बलबीर यांना परतावा देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला.  त्यामुळे बलबिर यांनी सदर कंपनीत आणखी रक्कम गुंतविण्याचा निर्णय घेऊन पैसे गुंतवणुक करण्यासाठी अग्रवाल याच्याकडे बँक खात्याची माहिती विचारली होती. मात्र अग्रवाल याने कंपनीचे ऑडीट सुरु असल्याचे कारण सांगून त्यांना स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात रक्कम पाठविण्यास सांगितले होते. तसेच सदर रक्कम तो कंपनीच्या खात्यावर ट्रान्स्फर करेल, असेही बलबीर यांना सांगितले होते. त्यामुळे बलबीर यांनी स्वत:च्या व पत्नीच्या खात्यातील तब्बल 61 लाख 50 हजार रुपये अग्रवाल याच्या बँक खात्यात पाठवून दिले. मात्र अग्रवाल दाम्पत्याने सदरची रक्कम व्हेन पॅल पॉली ट्रेडर्स कंपनीत गुंतवणुक न करता, त्या रक्कमेतील 13 लाख 85 हजार रुपयांची रक्कम बलबीर यांना परतावाच्या स्वरुपात परत दिली.  त्यावेळी बलबीर यांनी कंपनीच्या व्यवहाराच्या बिलाची मागणी केली असता, अग्रवाल याने त्यांना तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट ईमेलद्वारे पाठवून दिले होते. मात्र, त्याने ऑक्टोबर 2020 पासून बलबीर यांना परताव न दिल्याने बलबीर यांनी संशयावरुन त्यांना मेलवर पाठविण्यात आलेल्या कंपनीच्या बिलावरील जीएसटी नंबर व बँक स्टेटमेंटची पडताळणी केली. या तपासणीत सदर कंपनीचा जीएसटी क्रमांक अस्तित्वात नसल्याचे व बँक स्टेटमेंट बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बलबीर यांनी राजेंद्र सिंग, पवन अग्रवाल व मोनिका अग्रवाल यांच्याकडे गुंतवणुक केलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी पवन अग्रवाल व राजेंद्र सिंग यांनी बलबीर यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी फसवणुक केल्याचे बलबीर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments