पादचार्‍यावर हल्ला करुन लुटणार्‍या अज्ञात लुटारुचा पोलिसांकडून शोध सुरु....
पादचार्‍यावर हल्ला करुन लुटणार्‍या अज्ञात लुटारुचा पोलिसांकडून शोध सुरु.... 

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाजुला वावरणाऱया एका लुटारुने रात्रपाळीवरुन घरी परतणार्‍या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन त्याच्या जवळ असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. खांदेश्‍वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात लुटारु विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  
या घटनेतील तक्रारदार भास्कर ढेकले (40) हे पनवेलच्या आकुर्ली भागात भागात राहण्यास असून ते सकाळ मिडीयाच्या तळोजा येथील प्रेसमध्ये सीटीपी प्रोसेस ऑपरेटर म्हणून काम करतात. ढेकले हे रात्र पाळीवर कामाला गेले होते. त्यानंतर ते कामावरुन सुटल्यानंतर तळोजा येथून खारघर रेल्वे स्टेशनवर आले. तेथुन ते लोकलने पनवेल येथे गेल्यानंतर पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र 1 जवळच्या संरक्षण भिंतीच्या मध्यभागी असलेल्या पायवाटेने आपल्या घरी जात होते. यावेळी एका लुटारुने तंबाखु मागण्याच्या बहाण्याने ढेकले यांना अडविले. यावेळी ढेकले यांनी त्याला नकार दिल्यानंतर सदर लुटारुने त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या खिशात असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ढकले यांनी त्याला विरोध केल्यानंतर सदर लुटारुने बाजुलाच पडलेल्या डेब्रिज मधील सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा मोबाईल व रोख रक्कम लुटून त्याठिकाणावरुन पळ काढला. या मारहाणीत ढेकले गंभीर जखमी झाल्याने त्यांनी त्याच अवस्थेत आपले घर गाठले. त्यानंतर त्यांना प्रथम श्री हॉस्पीटलमध्ये व त्यानंतर लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्‍वर पोलिसांनी ढेकले यांचा रुग्णालयात जबाब घेऊन अज्ञात लुटारु विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments