रोडपाली वसाहतीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती व पथदिवे त्वरित सुरू करण्याची शिवसेनेची सिडकोकडे मागणी

पनवेल, दि. ३० (वार्ताहर) ः नव्याने विकसित होत असलेल्या रोडपाली वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून तेथील पथदिवे सुद्धा बंद अवस्थेत आहेत. तरी या दोन्ही नागरी समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख शिरिष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
यावेळी कळंबोली शहरप्रमुख डी.एन.मिश्रा, उपशहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, शहर संघटक संभाजी चव्हाण, शहर संघटक अक्षय साळुंखे, विभागप्रमुख महेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरी समस्या मांडताना त्यांनी सांगितले की, रोडपाली वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणे तसेच चालणे धोकादायक बनत चालले आहे. त्यातच पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेस हे खड्डे दिसून येत नसल्याने अपघात होत आहेत. लवकरच शाळा सुरू होणार आहेत तरी पालकांसह विद्यार्थ्यांना सुरळीतपणे ये-जा करण्यासाठी त्याचप्रमाणे दुर्गा विसर्जन सुद्धा आहे त्या अनुषंगाने रस्ते दुरुस्तीची कामे व पथदिवे त्वरित सुरू करावे अन्यथा शिवसेना सिडको विरोधात आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.

Comments