पनवेल दि.११ (वार्ताहर)- भटक्या व चावऱ्या कुत्र्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीने पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे.
महिन्याभरात ४ नागरिकांना कुत्रा चावल्याची तक्रार महानगपालिकेत देऊनही आरोग्य विभाग प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नाहित ह्याबद्दल नविन पनवेल महिला शहर संघटीका अपूर्वा प्रभू यांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिकांना कुत्रे चावतात त्यामूळे नागरिक मुलांना घरा बाहेर खेळायला पाठवायला, स्वतः बाहेर पडायला घाबरत आहेत. आज सकाळी फिरायला निघालेल्या वृद्ध महिलेला कुत्रा चावला त्यामुळे सेक्टर ८ मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेला निवेदन वजा तक्रार देऊन आज १५ दिवस होऊन गेले तरी महानगरपालिका कोणतीही सक्रियता दाखवत नाही आहे. लोकांच्या जीवाला धोका असूनही प्रशासन कोणतीही उपाय योजना करत नाही याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.