नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे अंधारमय परिसराला मिळाला उजाळा
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील मनिष मार्केट ते बापटा वाडा परिसर काही तासांकरिता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांसह पत्रकार गणेश कोळी यांनी राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून या असुविधेबाबत माहिती देताच तत्परतेने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या साथीने अथक प्रयत्न करून या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला.
शहरातील मनिष मार्केट ते बापटवाडा या भागातील विद्युत पुरवठा रविवारी रात्री खंडीत झाला होता. वीज वितरण कंपनीशी संपर्क साधण्यात येत होता. परंतु हवा तसा अनुकूल प्रतिसाद स्थानिक रहिवाशांना मिळत नव्हता. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता डी.के.मोरे, विकास कांबळे, विलास कांबळे, अर्जून डोंगरे, सुनील सानप, महेश खंडागळे, गौरव पाटील आदींशी संपर्क साधून येथील बिघाडाचा शोध घेतला असता तो उंच पोलवर व इतर वायरिंगशी संबंधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथे काम करण्यासाठी मोठे क्रेन उपलब्ध करून घेणे गरजेचे होते. तात्काळ राजू सोनी यांनी स्वखर्चाने मोठी क्रेन भाड्याने त्या ठिकाणी आणली व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी मेहनत घेवून अनेक तासानंतर हा विद्युत पुरवठा पुवर्वत केला. राजू सोनी यांनी तत्परतेने धाव घेवून मदतीचा हात दिल्याबद्दल परिसरातील रहिवाशी, व्यापारी व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Comments