केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ;१६ ऑगस्ट रोजी होणारे काम बंद आंदोलन तूर्त स्थगित ...
पनवेल (प्रतिनिधी) :-.  लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीचा आग्रह धरण्यासाठी दि. १३ ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त व भुमीपुत्रांच्या भावना त्यांच्या कानी घातल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. ज्योतीरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानुसार दिनांक १६ ऑगस्टपासून होणारे विमानतळाचे “काम बंद आंदोलन” तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आज(दि. १४) पत्रकार परिषदेत देण्यात आली.
       पनवेल शहरातील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिका उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दिपक पाटील, मनोहर पाटील, आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. 
यावेळी पत्रकारांना सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की, १० जून रोजी झालेले साखळी आंदोलन, २४ जूनला झालेले सिडको घेराव आंदोलन व ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जिल्हया जिल्हयात, तालुका तालुक्यात व गावागावात झालेल्या प्रचंड संख्येचे मशाल मोर्चे आंदोलन या सर्व आंदोलनाची दखल घेत आणि कृती समितीच्यावतीने दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेच पाहिजे यासाठी पेटून उठलेल्या स्थानिक जनतेच्या भावना व आंदोलनला मिळालेला प्रचंड प्रतिसाद याची दखल केंद्राने घेतल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसेच राज्य सरकार सिडकोमध्ये केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव दिल्लीत पाठविलेला नाही. राज्य सरकारच्या कॅबिनेटने असा ठराव केलेलाच नसल्याचे समजते. 
    सदर परिस्थिती लक्षात घेता व दि. १३ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बरोबर कृती समितीची बैठक झाली या विषयी सविस्त चर्चा करण्यात आली आणि प्रकल्पग्रस्त व भुमीपुत्रांच्या भावना कानी घालण्यात आल्या. केंद्रीय मंत्र्यांनीही या भावनेचा आदर केला. परंतु विमानतळाचे काम पूर्ण होणे हे ही प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. ज्या केंद्र सरकारने नामकरण करायला हवे त्याच मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान ठेवून दि. १६ ऑगस्ट पासून कृती समितीने पुकारलेले काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे., अशी घोषणा कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास भुमीपुत्रांचे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.  या आंदोलनाच्या निमित्ताने रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्हयात अनेक प्रश्न समोर आले आहेत. हे प्रश्न एकत्रितरित्या सोडविण्यासाठी पावसाळ्यानंतर 'भुमीपुत्र परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कोट- 
दिबांनी दिलेल्या मार्गातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकसंघ झाला आहे. दिबांचे नाव विमानतळाला लागण्यावबरोबरच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम कृती समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर करावा. - दशरथ पाटील, अध्यक्ष- कृती समिती 

कोट- 
दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे हि भूमिका कायम ठेवत तीन वेळा आंदोलन झाले आणि या आंदोलनांना भूतो न भविष्यतो असा प्रतिसाद लाभला. नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्पगस्त भूमिपुत्रांना आश्वस्त केले आहे. दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लावण्यासाठी यापुढेही जनजागृती आणि संघर्ष करण्याची तयारी कायम राहील. - आमदार प्रशांत ठाकूर
Comments