नगरसेवक विकास घरत यांच्या नेतृत्वाखाली कामोठेत "दुकाने खोलो"आंदोलन ; प्रशासनाचे दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन




पनवेल  :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सामान्य जनतेच्यासाठी सामान्य बाब होऊन राहिला आहे. निर्बंधांना फाट्यावर मारत जनता कुठे ना कुठे तरी आपापले इप्सित साधून घेत आहे. एव्हाना कोरोनाविषाणू प्रादुर्भाव हा केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत विषय शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, आणि ठाणे महानगरपालिका याठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनमानस सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर केवळ पनवेल महानगरपालिका लेवल 3 मध्ये असल्याकारणाने जाचक निर्बंधांना सामोऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्यात बुधवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी आक्रोश दिसून आला.
        लॉक डाऊन मुळे पिचून गेलेल्या व्यापाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे डायनॅमिक नगरसेवक विकास घरत यांच्याशी संपर्क  साधला.कामोठे विभागात दुकाने सिल करण्याचा धडाका व्यापाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण करत आहे. भिक नको पण कुत्रे आवर! अशा मानसिकतेत वावरणाऱ्या व्यापाऱ्यांनी विकास घरत यांना या अडचणीतून सोडविण्याचे अर्जव केले. विकास घरत यांनी व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन थेट आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. त्यांना व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत अवगत केले. आयुक्त महोदयांनी दोन दिवसात उच्च दरबारी हा विषय कळवून व्यापाऱ्यांना सकारात्मक तोडगा काढून देण्याचे आश्वासन देखील दिले. परंतु गेले 17 महिने कोरोना विषाणू मुळे प्रचंड नुकसान सहन कराव्या लागलेल्या व्यापाऱ्यांची मानसीकता एव्हाना प्रशासनाची आश्वासने ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. कुठल्याही परिस्थितीत मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई प्रमाणे आम्हीदेखील दुकाने आठ वाजेपर्यंत सुरू ठेवणार अशी त्यांची ठाम भूमिका होती.
      व्यापाऱ्यांनी प्रत्येक सेक्टर मध्ये फिरून दुकाने उघडी ठेवा अशी मोहीम राबविली. त्यांच्याशी चर्चा करायचे सोडून मग्रूर अधिकाऱ्यांनी एक दुकान सील करण्याचा घाट घातला. ते समजतात भाजप लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचा जत्था त्या ठिकाणी जाऊन थडकला. मुद्देसूद अभ्यासावर वॉर्ड ऑफिसर चर्चा करण्यास तयार नव्हते. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना आणि उपायुक्त यांना पाचारण करण्यात आले. व्यापाऱ्यांनी उपायुक्त गुळवे यांच्याशी मुद्देसूद चर्चा करून अद्यापही पनवेल महानगरपालिका लेवल 3 मध्ये का आहे असा प्रश्न केला? अर्थातच यावर उपायुक्तांच्या कडे समाधानकारक उत्तर नव्हते. अखेरीस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने नगरसेवक विकास घरत यांनी आगामी दोन दिवसात चार वाजता दुकाने बंद करू, परंतु या मुद्द्यावर आम्हास बैठक पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यावर उपायुक्तांनी शुक्रवारी याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ, भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
     या आंदोलनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग, रवींद्र जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव सहभागी झाले होते.


चौकट

आज गेले 17 महीने व्यापारी प्रचंड नुकसान सहन करत आहेत. दुकानाचे भाडे, नोकरांचे पगार, महावितरण ची बिले आदी देयके टाळेबंदी च्या सुमारास थांबली नाहीत. त्यामुळे आवक नसतानादेखील व्यापाऱ्यांनी पदरमोड करून अर्थव्यवस्था जिवंत ठेवली. आज जर लोकसंख्या निहाय पॉझिटिव रुग्णांची संख्या पाहून लेवल ठरविण्यात येत असेल तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बाधित रुग्ण संख्या अत्यल्प आहे.असे असताना महानगरपालिकेचे अधिकारी कुठलीही चर्चा न करता जर मग्रूर पणे कारवाईचा बडगा उगारण्या साठी तयार असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू.

विकास घरत : 
नगरसेवक पनवेल महानगरपालिका.
Comments