पनवेल दि. १० (वार्ताहर): मेल एक्सप्रेसमध्ये जबरी चोरी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नेरुळ-वडाळा गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे. दिलीप गोपाळ मिश्रा (२४) व नरेश उर्फ छोटु मोतीराम रैकवार (२१) अशी या दोघा आरोपींची नावे असून त्यांनी पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ गुन्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे. या गुह्यातील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
पनवेल मार्गे वेगवेगळ्या राज्यात जाणाऱया मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये घुसून प्रवासांचे दागिने व रोख रक्कम तसेच त्यांच्या बॅगा चोरीच्या घटनात वाढ झाली होती. त्यामुळे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मेल-एक्सप्रेस गाडीतील जबरी चोरी व चोरीच्या गुह्यांचा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नेरुळ-वडाळा गुन्हे शाखा युनिटकडून समांतर तपास करण्यात येत होता.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उप निरीक्षक शंकर परदेश व प्रकाश चौगुले व त्यांच्या पथकाने तपास सुरु केला असता, पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुह्यातील मोबाईल फोन भोपाळ येथे वापरण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा हा रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील आरोपी दिलीप गोपाळ मिश्रा व त्याचा साथीदार नरेश उर्फ छोटु मोतीराम रैकवार यांनी केला असल्याचे व सदरचे आरोपी हे भोपाळ रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे कलमाखाली अटक असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सदर दोघे आरोपी भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने न्यायालयाची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिलीप मिश्रा याच्याकडून त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चार गुह्यातील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले.