फेसबुकवरुन अनोळखी पुरुषासोबत मैत्री करणाऱ्या विवाहितेला भामटयाने घातला २ लाख २२ हजाराचा गंडा ...


पनवेल दि.४ (वार्ताहर): फेसबुकवरुन एका अनोळखी पुरुषासोबत मैत्री करणे कळंबोलीतील एका 31 वर्षीय विवाहितेला चांगलेच महागात पडले आहे. या विवाहितेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री केली, त्या व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून विवाहितेला जुनी कार विकत घेवुन देण्याचे व सदरची कार ओला व्यवसायामध्ये लावुन त्याद्वारे तीला पैसे मिळवुन देण्याचे आश्वासन देऊन विवाहितेकडून 2 लाख 20 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. विजय गुडरे असे या प्रकरणातील तोतया पोलिसाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्याचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणात फसवणूक झालेली विवाहिता कळंबोलीत पती व मुलासह रहाण्यास असून पती मजुरी करतो, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गत जानेवारी महिन्यामध्ये या विवाहितेच्या फेसबुकवर विजय गुडरे याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. विवाहतेने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर विजय गुडरे याने विवाहितेसोबत मॅसेंजरवरुन चॅटींगला सुरुवात केली. दोन महिन्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांनी मोबाईलवरुन बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान, विजय गुडरे याने तो पोलीस असल्याचे व तो कामोठे येथे रहाण्यास असल्याचे विवाहितेला सांगितले होते. त्यावेळी विवाहितेने तीची आर्थिक परिस्थीती खुपच हालाखीची असल्याचे सांगितल्यानंतर भामटÎा विजय गुडरे याने विवाहितेला जुनी कार विकत घेऊन देण्याचे व सदर कार ओला कंपनीत लावुन त्याद्वारे तीला पैसे मिळवुन देण्याचे आश्वासन तीला दिले.  
याबाबत विवाहितेने तयारी दर्शविल्यानंतर विजय गुडरे याने विवाहितेकडे कार विकत घेण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून  आपल्याकडील दागिने सोनाराकडे गहाण ठेवुन प्रथम 1 लाख रुपये विजय गुडरे याच्या बँक खात्यावर दोन टप्प्यात पाठवुन दिले. त्यानंतर देखील विजय गुडरे विवाहितेकडे पैशांची मागणी करत राहिल्याने विवाहितेने आपल्याकडील इतर दागिने दुसऱया सोनाराकडे गहाण ठेवून इतरांकडून कर्ज घेऊन भामटया विजय गुडरे याला आणखी रक्कम पाठवुन दिली. त्यानंतर देखील भामटया विजय गुडरे याने ज्या ज्वेलर्सच्या माध्यमातून विवाहितेने पैसे पाठविले होते, त्या ज्वेलर्सला परस्पर संपर्क साधुन ज्वेलर्सला पोलीस असल्याचे सांगुन विवाहितेने गहाण ठेवलेल्या दागिन्यांवर ज्वेलर्सकडून 10 हजार रुपये घेतले.  
अशा पद्धतीने भामटया विजय गुडरे याने विवाहितेकडून 2 लाख 20 हजार रुपये उकळल्यानंतर देखील त्याने वेगवेगळी खोटी कारणे सांगुन विवाहितेला कार देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विवाहितेने त्याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केल्यानंतर त्याने पैसे देण्यास सुद्धा टाळाटाळ केली. त्यामुळे विवाहितेने विजय गुडरे बाबत माहिती काढली असता, तो पोलीस नसल्याचे तीला समजले. त्यानंतर विजय गुडरे याने फसवणुक केल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. त्यानंतर तीने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विजय गुडरे या तोतया पोलिसा विरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल  करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

चौकट
आजकाल अनेक तरुणी व महिला हे अनोळखी लोकांचे फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारुन त्यांच्याशी चॅटींगद्वारे संपर्क ठेवत असल्याने अशा अनोळखी व्यक्तीकडून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषता महिला व तरुणींनी अशा अनोळखी व्यक्तींशी फेसबुक अथवा सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून मैत्री करु नये. तसेच अशा व्यक्तींच्या अमिषाला व भावनिक आवाहनाला देखील बळी पडू नये. असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविण पाटील यांनी केले आहे.
Comments