पनवेलच्या झोपडपट्टीवासियांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार...पनवेल  :-  पनवेल महानगरपालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती दिली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत येत्या काही दिवसात याच्या निविदा काढण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पनवेलमधील लक्ष्मी वसाहत, वाल्मिकी नगर, महाकाली नगर, कच्छी मोहल्ला, पटेल माहोल्ला या झोपडपट्ट्याचे पुनर्वसन केले जाणार आहे. या झोपडपट्ट्यांमधील सुमारे 1396 लाभार्थ्यांना या योजनेमध्ये घरे मिळणार आहेत. १३ ऑगस्ट  झालेल्या बैठकित आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी या योजनेचे अंतिम प्रारूप ठरवले. यानुसार  महासभेत ठराव मंजूर करून पुढील महिन्यात कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 2016 मध्ये झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानूसार 60 विविध झोपडपट्ट्यांमधील साडेआठ हजारांहून अधिक लाभार्थी राहत असल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. जुन्या नगरपरिषद क्षेत्रातील 26 झोपडपट्ट्यांमधील 4 हजार झोपडपट्टी वासियांना घरे मिळावित यासाठी पालिका गेले तीन वर्ष प्रयत्न करत होती, अखेर पहिल्या टप्प्यात लक्ष्मी वसाहत, वाल्मिकी नगर, महाकाली नगर, कच्छी मोहल्ला, पटेल माहोल्ला या पाच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळाली आहे.

पहिल्या टप्प्यातील गृहनिर्माण योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला 29 चौरस फूटाचे म्हणजे 350 फुटांचे घर मिळणार आहे. महापालिका, केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून 450 कोटी रूपये या योजनेवरती खर्च करणार आहेत. बाजारमूल्यांपेक्षा अत्यंत कमी दरात ही घरे लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती आयुक्त  गणेश देशमुख यांनी दिली आहे.


पहिल्या टप्प्यात 632 आर्थिक दृष्ट्या मागास कुंटूबांना घरे मिळणार आहेत तर कमी उत्पन्न गटातील १५७ कुंटूबांना घरे मिळणार आहेत. याशिवाय ९० दुकाने बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या निविदा ईपीसी तत्वानुसार होणार असून नवीन बीएमपीटीसी तंत्रज्ञाचा वापर करून बांधकाम करण्यात येणार आहे. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी यासाठी विशेष नियोजन केले असून अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यांवर महापालिकेचा भर आहे


महासभेमध्ये या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान आवास योजना विभागाअंतर्गत लाभार्थ्यांसोबत चर्चा, मेळावा, बँकेसोबत बैठका , झोपडपट्टी मध्ये जनजागृती या सर्व गोष्टी होणार आहेत.

या बैठकित अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, प्रकल्प सल्लागार मेघा गवारे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी, पालिकेचे स्थापत्य अभियंता प्रसाद परब, व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ गजानन देशमुख आदि उपस्थित होते.
Comments