सायबर क्राईम थांबविण्यासाठी व.पो.नी देविदास सोनावणे ॲक्शन मोडवर, आमिषांना बळी न पडण्याचे नागरिकांना आवाहन

पनवेल / वार्ताहर :-  सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये सध्या सायबर क्राईम ने थैमान घातले आहे. एकीकडे कॅशलेस ट्रांझेक्शन नागरिकांच्या अंगवळणी पडू लागले आहे तर दुसरीकडे याच कॅशलेस ट्रांसेक्शन चा गुन्हेगारी जगताने शस्त्र म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. टेली कॉलर च्या माध्यमातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्‍वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी कंबर कसली आहे.
      याबाबत प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी अशा गुन्हेगारांची कार्यप्रणाली नागरिकांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आमिषे, बक्षिसे यांना भुलणारे नेहमी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अशा अमिषांपासून पासून दूर राहिले पाहिजे.ते पुढे म्हणाले की सतर्कता ही या गुन्ह्यांना अटकाव घालण्याची गुरुकिल्ली आहे.
       नागरिकांची कशा प्रकारे फसवणूक होते त्यातील प्रत्येक बाबीचा देविदास सोनवणे यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या पुढे त्यांनी यातील प्रत्येक बहाणा उलगडून दाखविला. तुमची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाली आहे, तुमच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळवून देतो, तुम्हाला हॉलिडे पॅकेज चे बक्षीस लागले आहे हॉटेल बुकिंग साठी डिटेल्स द्या, बँकेतून बोलत आहोत तुमची केवायसी डिटेल्स अपडेट करायची आहे, सिम कार्ड रजिस्ट्रेशन रद्द झाले आहे, सिम कार्ड डाटा करप्ट झाला आहे, डिजिटल पेमेंट सिस्टिम हॅक झाली आहे.या किंवा अशा अनेक कारणांनी तुमच्याकडून अकाउंट डिटेल्स,क्रेडिट कार्ड डिटेल्स,cvc क्रमांक,otp मागितले जाऊ शकतात. समोरची व्यक्ती अत्यंत गोड आणि लाघवी भाषेत बोलत असल्या कारणामुळे अनेकदा नागरिक फसतात. त्यामुळे अशा प्रकारचे फोन आल्यास नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे.कुठल्याही पद्धतीने तुमची डिटेल्स टेली कॉलर ला फोन वर देऊ नका.
      सोनावणे पुढे म्हणाले की टेक्नॉलॉजी चा जास्त वापर करणारे, डॉक्टर,इंजिनीअर, वकील अशा वर्गाला याचा जास्त फटका पडत आहे. कित्येकदा फसवणूक काही हजारांची किंवा छोट्या रकमेची असल्या कारणामुळे नागरिक तक्रार करायला येत नाहीत. परंतु अशानेच सायबर गुन्हेगारांचे फावते व गुन्हे पचत आहेत म्हणून त्यांचे धारिष्ट्य वाढत जाते. फसवणूक झाल्यास तक्रार करायला अजिबात मागे राहू नका. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सतर्क राहून गुन्हेगारांना संधीच मिळणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Comments