लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ''संगीत मॅरेथॉन''
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ''संगीत मॅरेथॉन'' 


पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'उत्कर्ष संगीत मैफिल' तर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर ७५ गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉनचे शनिवार दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. 
     गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे हा संगीत कार्यक्रम सकाळी ११.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सलग होणार आहे. या कार्यक्रमात गायक गोपाळ पाटील स्वतः ७५ गाण्यांची मनमोहक सादरीकरणे करणार असून, या कार्यक्रमात उरण, पनवेल आणि नवी मुंबई येथील ७५ गायकांचा गायक म्हणून सहभाग लाभणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. गेली पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी सामाजिक कार्याची अखंड परंपरा जपली आहे आणि हे कार्य त्यांच्याकडून अखंडपणे सुरूच आहे. यंदा त्यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, भजन स्पर्धा, रक्तदान शिबीर, शिधा वाटप, विविध क्रीडा स्पर्धा, नाट्य महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा अशी विविध समाजोपयोगी उपक्रमे संपन्न झाली असून पूर्ण वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रमे होणार आहेत. त्याच अनुषंगाने उत्कर्ष संगीत मैफिल प्रस्तुत ७५ गाण्यांची संगीत मॅरेथॉन होणार असून रसिक प्रेक्षकांनी या अनोख्या गायन पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गायक गोपाळ पाटील आणि सहकारी गायकांनी केले आहे.
Comments