पनवेल तालुका पत्रकार विकास मंच करणार पूरग्रस्तांना भरघोस आर्थिक सहाय्य...

पनवेल / प्रतिनिधी :- रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये महाड सह संपूर्ण कोकण किनारपट्टीत थैमान घातलेल्या महापुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पुनर्वसन करण्याकामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये भरघोस आर्थिक सहकार्य देण्यात येणार आहे.
       बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष माधव पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख, माजी आमदार माणिकराव जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेठ पाटील, पत्रकार नवीनचंद्र सोष्टे आदी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित तमाम सदस्यांच्या वतीने दोन मिनिटे मौन बाळगून दिवांगतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
       महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त बांधवांना निकडीने गरज लागते ती अन्नधान्य, सुके कपडे, भांडीकुंडी आणि दररोज शिजवलेले अन्न. अनेक सेवाभावी संस्था,राजकीय पक्ष आणि प्रशासन या कामी झपाटून काम करत आहेत. अनेक कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या घरातील गाळ काढण्यासाठी खपत आहेत. परंतु आता या पूरग्रस्त बांधवांना उभारी देण्यासाठी आणि त्यांची घरे पूर्ववत शाकारण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे. या कामी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने भरघोस आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.बुधवारी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार विजय तळेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे.
      पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही पनवेल तालुक्यातील  पत्रकारांची नोंदणीकृत संघटना आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून कायम पनवेल तालुका पत्रकार विकास मंच सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवित आला आहे. महाड सह रायगड मधील पूरग्रस्तांना भरघोस आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेऊन मंचाने आपले समाजभान जागृत असल्याचा संदेश दिला आहे.
       या बैठकीला अध्यक्ष माधव पाटील, सल्लागार संजय सोनावणे, सचिव मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, हरेश साठे, प्रवीण मोहोकर,राजू गाडे,सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments