कामोठे वसाहतीत महनगरपालिकेच्या धोरणा विरोधात मूक मोर्चा......

पनवेल, दि.७ (वार्ताहर) :-  पनवेल महानगरपालिकेने पाच वर्षाचा मालमत्ता कर लागू केला आहे. त्याची रक्कम मोठी आहे. त्याचबरोबर सेवा दिली जात नसतानाही वेगवेळया विषयाखाली कर घेतला जात आहे. याला रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.                 याबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता कामोठेकरांनी बुधवारी मूक मोर्चा काढून चुकीच्या मालमत्ताकराला एक प्रकारे बोलका विरोध दर्शवला. फलक दाखवून मनपाच्या धोरणाला विरोध दर्शविण्यात आला. 

पनवेल महानगरपालिकेची २०१६ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून पाच वर्षांचा थकीत कर मनपा प्रशासनाने लागू केला आहे. वास्तविक पाहता जेव्हा ठराव झाला तेव्हापासून कर लागू करणे आवश्यक आहे. मात्र मनपाने स्थापनेपासून कर आदा करण्याबाबत रहिवाशांना सुचीत केले आहे. त्याचबरोबर कचरा वगळता बाकी सर्व सुविधा सिडको देते. त्याबदल्यात सेवा शुल्क वसाहतीतील रहिवाशांनी भरलेले आहे. तरीही पाणी, मलनिःसारण, शिक्षण, अग्निशमन सेवेबाबत कराचा रचनेत समावेश करण्यात आलेला आहे. जी सेवा महानगरपालिकेने दिलीच नाही त्याचा कर आम्ही का दयायचा अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्था तसेच विरोधी पक्षानेही मालमत्ता कराला विरोध दर्शवला आहे. 
बुधवारी कामोठे वसाहतीत रहिवाशांनी एकत्रीत येऊन मुक मोर्चा काढला. मानसरोवर गृहसंकुलापासून हा मोर्चा सुरू झाला. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक त्याचबरोबर चाकरमानी सहभागी झाले होते. कर नाही तर डर कशाला सेवा, सुविधा नाही तर कर कशाला, महापालिका कर घेणार सुविधा कोण देणार, प्रशासनाने जनतेचे ऐकले पाहिजे, मालमत्ता कर कमी केला पाहिजे, जुलमी मालमत्ता कर लावणार्‍या पनवेल महापालिकेचा निषेध, नाही भरणार नाही भरणार मालमत्ता कर नाही भरणार असे संदेश लिहिलेले फलक दाखवून मोर्चेकरांनी सर्वांचे लक्ष वेधले. कामोठे पोलीस ठाण्यासमोरील चौकात मोर्चाची सांगता झाली.
यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, एकता सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे, मंगेश अढाव, प्रशांत कुंभार, सिटीझन युनिटी फोरमच्या रंजना सडोलीकर, दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंधळे,अस्मिता सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ऍड सुलक्षणा जगदाळे, संगिता राऊत राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरदास गोवारी, शहराध्यक्ष चंद्रकात नवले, निलेश लंके प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख भाऊशेठ पावडे, दिलीप घुले, समर नवले, सचिन वाफारे यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ताधारी नगरसेविका लिना गरड यांचाही सहभाग
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका लिना अर्जुन गरड यांनी सुरूवातीपासून मालमत्ता कराला विरोध दर्शवला आहे. त्यांनी याबाबत खारघर फोरमच्या माध्यमातून या कराविरोधात जनजागृती केली होती. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नगरसेविकांबरोबर सभागृहात जावून मालमत्ता कराला विरोध केला होता. दरम्यान बुधवारी कामोठे येथील मुक मोर्चात गरड या सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हा अन्यायकारक कर न भरण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कामोठे येथून मालमत्ता कराविरोधातील एल्गार
कामोठेकरांनी खर्‍या अर्थाने एल्गार पुकारला. याचे लोण इतर वसाहतीत सुध्दा पसरेल आणि तेथेही विरोधात अशा प्रकारे रहिवाशांचा उद्रेक होईल. शेवटी महापालिका प्रशासनाला ही कररचना मागे घ्यावी लागेल असे मत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. 

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी हा अन्यायकारक कराविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याला सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले.
लेफ्ट टर्न आंदोलनानंतर कामोठेकर मालमत्ता कराविरोधात उर्स्फुतपणे बुधवारी रस्त्यावर उतरले. पनवेल महापालिकेने कराची चुकीची रचना केलेली आहे. त्यामुळे दुहेरी कर मानगुटीवर बसलेला आहे. कोरोना संकटाच्या काळात पाच वर्षांची थकबाकी लादण्यात आलेली असून हे कोणते धोरण असा आमचा सवाल आहे. या विरोधात चळवळ सुरूच राहिल अर्थात त्याला समस्त कामोठेकरांचे पाठबळाची गरज आहे.कारण हा कर प्रत्येकाच्या घरात येऊन बसलेला आहे
अमोल शितोळे
एकता सामाजिक संस्था 

कोरोना संकटात अनेकांचे नोकरी व्यवसाय बुडालेले आहेत. त्याचबरोबर महागाईचा भस्मासुर वाढला आहे. इंधनाच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यात चुकीच्या पध्दतीने मालमत्ताकर पनवेलकरांवर लादण्यात आला आहे.त्यामुळे रहिवाशी हवालदील झाले आहेत. त्याचा उद्रेक बुधवारी मुक मोर्चात दिसून आला.
निलम आंधळे
संस्थापिका,दिशा महिला मंच


Comments