केवायसी अपडेटच्या बहाण्याने रेल्वे गार्डची फसवणूक.....
केवायसी अपडेटच्या बहाण्याने रेल्वे गार्डची फसवणूक.....

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः मोबाईल नंबरची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने रेल्वे गार्डच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे रेल्वेच्या गार्डकडून संपूर्ण माहिती घेवून त्याच्या खात्यातून 59 हजार रुपयाची रक्कम परस्पर काढून घेतल्याने त्याच्या विरोधात पनवेल रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुंदन मोरे असे फसवणूक झालेल्या रेल्वे गार्डचे नाव असून ते पनवेल रेल्वे स्थानकातून पेण येथे कामावर जात असताना यावेळी चोरट्याने केवायसी अपडेट करण्याचा व केवायसी अपडेट न केल्यास त्यांचा मोबाईल फोन बंद होईल असा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठविला. तसेच कस्टमकेअरचा नंबर म्हणून एक मोबाईल नंबर दिला. त्यावर मोरेंनी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार मोरे यांनी 10 रुपये फि ऑनलाईन पाठविली. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून प्रथम 45 हजार व काही वेळा नंतर 14 हजार रुपये रक्कम वजा झाल्याचा त्यांना मेसेज आला. आपल्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्ती पैसे काढून घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पेण येथे उतरुन बँकेत जावून आपले खाते बंद करून घेतले व पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात येवून याबाबत अज्ञात इसमावर सायबर गुन्हा दाखल केला आहे.
Comments