ग्रामसेवक नसल्याने नागरिकांची वडघर ग्रामपंचायतीत फेऱ्या ; नागरिकांची कामे खोळंबली , ग्रामसेवक नेमण्याची मागणी


पनवेल,(प्रतिनिधी) -- नुकताच वडघर ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्याला घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी 95 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने अटक केली होती. या ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्याने त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कारवाई झालेल्या ग्रामसेवकाचे निलंबन आदेश आल्यावरच नवीन ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी दिली. मात्र वडघर ग्रा.प ला ग्रामविकास अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे.

पनवेल तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासक म्हणून ग्रामीण आरोग्य विभागातील प्रदीप अण्णा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून डी.यु.देवरे हे काम पाहात होते. मात्र नुकतेच एका घरमालकाला घरपट्टी आणि अ‍ॅसेसमेंटचे उतारे पाहीजे होते. यासाठी त्यांनी वडघर ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी दगडू देवरे यांच्याशी संपर्क केला असता त्याने 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. 95 हजारावर तडजोड झाली. ठरल्यानुसार 21 जुन रोजी दुपारी पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिजा गाडीमध्ये तक्रारदाराकडून 95 हजाराची लाच स्विकारताना देवरे आणि दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी या दोघांना अ‍ॅन्टी करप्शन पथकाने ताब्यात घेतले होते. या प्रकरणानंतर वडघर ग्रामपंचतीला ग्रामविकास अधिकारी नाही. कारवाई झालेल्या ग्रामविकास अधिकाऱयांच्या निलंबनासाठीचा प्रस्ताव पनवेल पंचायत समिती कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग ला पाठविण्यात आला आहे. मात्र या लाचखोर अधिकाऱयांची निलंबन आदेश आलेले नाही. त्यामुळे नवीन ग्रामविकास अधिकारी नेमता येणार नसल्याचे मोहिते यांनी सांगितले. मात्र वडघर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे. त्याचबरोबर येथील नागरिक कामासाठी फेऱ्या मारत असून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. मात्र नवीन ग्रामसेवकांची लवकरच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

प्रशासकाच्या बदलीबाबत तक्रार अर्ज दाखल

वडघर ग्रामपंचायतीच्या प्रशासक अधिकारी यांची बदली करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी जोर लावला आहे. यातच काही नागरिकांनी रायगड जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग तर पनवेल पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रार अर्ज दिले आहेत. याबाबत पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लता मोहिते यांना विचारणा केली असता वडघर ग्रा.प.तीच्या प्रशासक अधिकारी यांच्या बदलीबाबतचे तक्रार अर्ज आले आहेत. याबाबत वरिष्ठांकडे अर्ज पाठवून चौकशी करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
Comments