लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा...
१९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ भाग घेणार
२० ते २२ फेब्रुवारीपर्यंत रंगणार कबड्डीचा दम
पनवेल (प्रतिनिधी)
गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७५ वा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सवी वर्ष अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे होत आहे. त्या अनुषंगाने श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पदाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि. २० ते रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानात संपन्न होणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह जे. जे. पाटील आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक व जिल्हा पंच मंडळाचे अध्यख शरद कदम यांनी (दि. १२) उलवे नोड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले अजितदादा पवार यांना पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर, खजिनदार जगदीश पाटील, समीर माने, जनार्दन पाटील, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, ऍड. राहुल घरत, भार्गव ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कबड्डीचे अतूट नाते असून या मंडळाने स्पर्धेला बळ दिले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये कबड्डीचे दर्जेदार आयोजन असते असे जे. जे.पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे त्याबद्दल आभार मानले. त्यांनी स्पर्धेविषयी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना सांगितले कि, रायगड जिल्ह्यातील प्रौढ महिला व पुरुष कबड्डी खेळाडूंकरिता ही स्पर्धा जिल्हा अजिंक्य पदासाठी निवड चाचणी स्वरूपात घेतली जाणार असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ भाग घेणार आहेत. त्या अनुषंगाने २७७२ पुरुष आणि ४४८ महिला असे एकूण ३२२० खेळाडू सहभागी होणार आहेत. १९८ कबड्डी संघांमधून पुरुष संघातून संभाव्य २० खेळाडूंची तर ३२ महिला संघामधून संभाव्य २० महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. आणि त्यातून निवड झालेला १४ पुरुष खेळाडूंचा संघ व १४ महिला खेळाडू संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या दोन्ही संघाचा मार्गदर्शक सराव शिबिरसुद्धा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे याच मैदानावर घेण्यात येणार आहे. तसेच दिनांक १३ फेब्रुवारीला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या १०० पंचांचे एक दिवसीय मार्गदर्शक शिबीर पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि चुरशीच्या सामन्यांची क्रीडारसिकांना मेजवानी मिळणार आहे. लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या क्रीडा स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाला चालना मिळून नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार असून या स्पर्धेसाठी छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुनवीर, राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धेची तयारी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेसाठी चार सुसज्ज मैदाने उभारण्यात येत असून सर्व खेळाडू व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधांचीही तयारी सुरु आहे. स्पर्धेचे सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध आयोजन सुनिश्चित करण्यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे स्वयंसेवक तसेच सुमारे १०० नामवंत पंच कार्यरत असणार आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा उच्च दर्जाची आणि यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला.
कोट-
अजितदादा पवार आणि कबड्डी यांचे अतूट नाते होते. आपल्या मातीतल्या या खेळाला त्यांनी नेहमीच मनापासून प्रोत्साहन दिले. विशेषतः रायगड संघाबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. त्यांच्या आशीर्वादामुळे रायगड जिल्ह्याचा संघ महाराष्ट्राच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावेल, असा मला विश्वास आहे.
-– लोकनेते रामशेठ ठाकूर
चौकट-
लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजकार्यातील अखंड परंपरा जपली असून, आजही ती त्याच जोमाने सुरू आहेत. यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी (७५व्या) वर्षाचे औचित्य साधून कीर्तन महोत्सव, भजन स्पर्धा, रक्तदान शिबीर, शिधा वाटप, विविध क्रीडा स्पर्धा, नाट्य महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, संगीत मॅरेथॉन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पूर्ण वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने 'रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा' होणार आहे.