फिंगरप्रिंटच्या आधारे घरफोडीचा छडा ; झारखंडमधून आरोपी जेरबंद, ८ लाखांची रोकड जप्त...
गुन्हे शाखा कक्ष ३ ची धडक कारवाई
फिंगरप्रिंटच्या आधारे घरफोडीचा छडा ; झारखंडमधून आरोपी जेरबंद, ८ लाखांची रोकड जप्त


पनवेल, दि.21 (संजय कदम) ः पनवेल शहरातील टिळक रोड परिसरातील एका घरात घरफोडी करून 10 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला पनवेल गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने फिंगरप्रिंटच्या आधारे शोधून काढत झारखंडमधून अटक केली आहे. आरोपीकडून 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्याने इतरही घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती प्रदीप कदम (वय 53) या 14 जुलै 2026 रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्याने घरातील 13.25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10.75 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीस गेलेल्या मुद्देमालात शाही हार, पाटल्या, मोठे व छोटे मंगळसूत्र, सोन्याच्या चेन, कानातील दागिने, नथ, अंगठ्या, नेकलेस तसेच रोख रकमेचा समावेश आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळावर मिळालेल्या चान्स प्रिंट (बोटांचे ठसे) नमुन्यांची अंगुलीमुद्रा तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. प्राप्त अहवालाच्या आधारे आरोपीची ओळख विकाशकुमार दिनेश यादव (वय 33), रा. अकदोनी खुर्द, पोस्ट बनियाडीह, पोलीस ठाणे मुखसिल, जि. गिरिडीह (झारखंड) अशी पटली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाने झारखंड येथे जाऊन आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, इतर घरफोडीच्या गुन्ह्यांबाबतही त्याची चौकशी सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान बिले, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे, पोलीस हवालदार प्रशांत काटकर, प्रमोद राजपूत, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, अजिनाथ फुंदे, महिला पोलीस हवालदार हिरकणी पवार, महिला पोलीस नाईक विनया पाटील, पोलीस शिपाई लवकुश शिंगाडे, प्रसाद घरत आणि विक्रांत माळी यांनी पार पाडली.
फोटो ः आरोपी
Comments