पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तात्काळ मदत
पनवेल / प्रतिनिधी - : वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार वाहतूक नियमनासोबतच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठीही तत्पर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
पहिली घटना : न्यू पनवेल सिग्नल येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस नाईक 4415 विश्वनाथ पाटील व पोलीस शिपाई 12061 संजय घाडगे यांच्या निदर्शनास एका टेम्पो चालकास अचानक आकडी (फिट) आल्याची घटना आली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन संबंधित चालकावर प्राथमिक उपचार केले. चालक शुद्धीवर आल्यानंतर वाहन मालकाशी संपर्क साधून त्यास भावेश मालपाणी, रा. पनवेल यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चालकास वाहनासह रुग्णालयात रवाना करण्यात आले.
दुसरी घटना : त्याच ठिकाणी कर्तव्यावर असताना एमएच-०६-सीव्ही-४६०९ क्रमांकाच्या वाहनावरील चालकाकडून एका स्कुटीला धक्का लागल्याने एक इसम खाली पडून जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक विश्वनाथ पाटील व पोलीस शिपाई संजय घाडगे यांनी तात्काळ जखमीस रिक्षामधून पटवर्धन हॉस्पिटल येथे उपचारासाठी रवाना केले. संबंधित दुचाकी चालविणारी महिला देखील त्यांच्यासोबत होती.
या दोन्ही घटनांमध्ये वाहतूक पोलिसांनी दाखविलेली तत्परता, मानवतावादी दृष्टिकोन आणि वेळेवर दिलेली मदत यामुळे जखमींना त्वरित उपचार मिळू शकले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या या कार्याचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले.