पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना तात्काळ उपचार
पनवेल /प्रतिनिधी - : रविवार दि.१२ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.०० वाजण्याच्या दरम्यान शिवशंभू नाका ते पळस्पे मार्गावरील मुख्य रस्त्यावर, गाढी नदीपुढे कोस्ट गार्ड बिल्डिंगसमोरील नांदगाव कट येथे दोन दुचाकींचा अपघात झाला. याबाबतची माहिती शिवशंभू सिग्नल येथे वाहतूक नियमन करत असलेले बीट मार्शलवरील पोलीस हवालदार अमीर मुलाणी व पोलीस शिपाई सुरेश जौंजाळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
अपघातात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या दोन महिला व एका पुरुषाला पोलीस हवालदार अमीर मुलाणी, पोलीस शिपाई सुरेश जौंजाळ व उपस्थित नागरिकांच्या मदतीने कोणताही विलंब न करता, ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता रस्त्याने जाणाऱ्या दोन खासगी ऑटो रिक्षांद्वारे उपचारासाठी तात्काळ पनवेल ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी रस्त्याच्या बाजूला काढून बीट मार्शल अंमलदार व नागरिकांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) भागवत मॅडम यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी पनवेल ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. तिघांचीही प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे समजले. यावेळी रुग्णालयात उपस्थित नातेवाईकांनी पोलीस व नागरिकांनी केलेल्या तात्काळ मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, कर्तव्यदक्षता व मानवतावादी भूमिका यामुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाले. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.