युवासेनेचा जनहिताच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा ; आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक..
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांवर युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा संपर्कप्रमुख विश्वजीतजी बारणे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेशजी चितळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील मोबाईल विक्री वाहनधारकांचा प्रश्न, रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणे तसेच पनवेलमध्ये शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत (CMEGP) व्यवसाय करणाऱ्या ३७ पेक्षा अधिक मोबाईल विक्री वाहनधारक कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला. शासनाच्या अधिकृत योजनेतून उद्योग सुरू केलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना महापालिकेमार्फत अधिकृत व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये तसेच या प्रश्नावर कायमस्वरूपी धोरण तयार करण्यात यावे, अशी ठाम मागणी युवासेनेने केली.
त्यानंतर पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि प्रवाशांच्या गैरसोयीचा विषय उपस्थित करण्यात आला. स्थानक परिसरात वाढणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई, अधिकृत पार्किंगची उभारणी, अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम, दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि महानगरपालिका, वाहतूक पोलीस व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
याच बैठकीत पनवेल शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र तातडीने सुरू करण्याच्या मागणीचाही जोरदार पाठपुरावा करण्यात आला. यापूर्वी सादर केलेल्या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल जाहीर करावा, व्यसनमुक्ती केंद्रासाठी योग्य जागा निश्चित करून राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा, संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करावी तसेच संपूर्ण प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन जाहीर करावे, अशी मागणी युवासेनेने केली.
युवासेनेने बैठकीत स्पष्ट भूमिका मांडली की, रोजगाराचे संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या विषयांमध्ये कोणताही विलंब न करता तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होईल.
आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. संबंधित विभागांशी समन्वय साधून या सर्व विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच योग्य तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी नगरसेवक तथा महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, जिल्हा अध्यक्ष रोशन पुजारी, जिल्हा सचिव रोहन ढोले, जिल्हा समन्वयक प्रतिक ढोंगरे, विधानसभा संपर्क प्रमुख ॲड अभिनय सोमण, विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, विधानसभा संघटक ओंकार वेदांते, सोशल मिडिया तालुका प्रमुख सृजन जोशी, शहर अध्यक्ष जयेश विसावे, ॲड. तुषार चौधरी, वृषभ गोंधळी, शहर सचिव विनीत पाटील, यश म्हात्रे, शहर समन्वयक दुर्गेश शुक्ला, भावेश घावट, शहर उपाध्यक्ष आदिल शेख, विभाग अध्यक्ष अक्षय पवार, आयुष ओंबळे, विभाग उपाध्यक्ष फरहाद शेख, सोशल मीडिया खांदा कॉलनी अध्यक्ष साई मोप्सुगू, सूर्यांश तिवारी आदी उपस्थित होते.
युवासेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, पनवेलकरांच्या रोजगार, सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर युवासेना यापुढेही ठामपणे आवाज उठवत राहील आणि जनहितासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहील.