पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक वृक्षारोपणाने संपन्न ..

नवीन पनवेल / प्रतिनिधी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसादिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
पनवेल तालुक्यातील सतीची वाडी येथे शिवतेज मित्र मंडळ नवीन पनवेल आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवीन पनवेल शिवसेनेचे नेते आनंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन चोरघे, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक घोसाळकर, खजिनदार तथा आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, सचिव तथा दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे, ज्येष्ठ पत्रकार प्रदिप ठाकरे, रसायनी टाईम्सचे संपादक अनिल भोळे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोपी, दैनिक कृषिवलचे प्रतिनिधी राजेश डांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी प्रास्ताविकात उपाध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा हेतू मांडला. त्यानंतर मार्गदर्शन करताना वनस्पती तज्ञ सुधीर पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व मांडले. यावेळी त्यांनी पनवेल तालुका पत्रकार महासंघ तसेच शिवतेज मित्र मंडळ हे काम निश्चितपणे करू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे नेते आनंद पाटील यांनी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विशद केले. वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते नितीन चोरघे यांनी व्यक्त केली. 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदिप ठाकरे म्हणाले की, आजही बहुतांश ठिकाणी भरपूर प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. यामुळे कडक उन्हाळा, जागतिक तापमान वाढ, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर येत आहेत. म्हणूनच पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्या वाढदिवसादिनी आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम नक्कीच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.  
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अनिल भोळे म्हणाले की, आपल्या परिवारात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा वृक्ष, गावातील ज्या तरुणांचे विवाह होतील त्यासाठी शुभमंगल वृक्ष, कौतुक सोहळ्यासाठी आनंद वृक्ष आणि मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी स्मृती वृक्ष लावण्यात यावेत, असे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार व्यक्त करताना सचिव मयूर तांबडे यांनी, वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, यासाठी  पनवेल तालुका पत्रकार महासंघ तसेच शिवतेज मित्र मंडळ यांनी पुढाकार घेतला असून अन्य सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राहील, असेही ते म्हणाले.
Comments