पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात २ ठार १ जखमी...


पनवेल, दि.३० (वार्ताहर) ः पनवेल परिसरात गेल्या २४ तासात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेलजवळील कोन सावळा रोड, सोमटणे पेट्रोल पंपाजवळ, टिसीएल कंपनीच्या गेटसमोरील रस्त्यावर प्रतिक गोडीवले (वय-25, रा.-गुळसुंदे) हे त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवून ओव्हरटेक करीत असताना, समोरून येणार्‍या यामाहा कंपनीच्या मोटारसायकलीस ठोकर मारून झालेल्या अपघातात प्रतिक गोडिवले हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला आहे. तर शेखर गडगे (वय-25, रा.-वडगाव) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसर्‍या घटनेत तळोजा औद्योगिक क्षेत्रातील देना बँकेजवळ, मोतीराम लडकू दुर्गे (55) यांना टँकरची जोरदार धडक लागल्याने त्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने ते चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाल्याने अपघातग्रस्त दुर्गे यांचा मृतदेह काही काळ रस्त्यावरच पडून होता. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे वपोनि महेश पाटील व त्यांचे पथक त्वरित घटनास्थळी गेले.
Comments