विमानतळाला बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडी ठाम....



पनवेल  / प्रतिनिधी   :-   नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याकरता तिथे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते राजकारण करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना भडकविण्याचा घाट घातला आहे. मात्र पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या समितीचे बबनदादा पाटील, आ.बाळाराम पाटील, मा.आ.मनोहर भोईर, आर.सी.घरत, जे.एम.म्हात्रे, महेंद्र घरत, प्रशांत पाटील, शिरीष घरत, काशिनाथ पाटील, सुदम पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील,  गणेश कडू, राजेश केनी, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, प्रदीप ठाकूर, दीपक घरत, लीलाधर भोईर,आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळ नामकरणासाठी इतका अट्टाहास होता, तर प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना तसा ठराव का केला नाही ? किंवा मग सहा महिन्यापूर्वी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली त्यावेळी हे नेते कुठे गेले होते ? जर यांना दि.बा.पाटील यांच्या नावासाठी झटायचे होते मग ६ महिने कोणाची वाट बघत होते ? आज राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करीत आहे आणि भाजपचे राज्यातील नेते सरकार पाडण्यासाठी नको त्या थराला जात आहेत. अशीच परिस्थिती आता पनवेल उरणमधील स्थानिक भाजप नेते करत आहेत. मात्र असे करताना स्थानिक भूमिपुत्रांच्या वेळेचा गैरवापर करून त्यांना भडकविण्याचे गलिच्छ राजकारण होत आहे.

विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे ? याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन नंतर आपण भूमिका मांडणार होतो. मात्र त्यापूर्वीच राजकारण करण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तयारी दर्शवली. त्यानंतरही जासई येथे झालेल्या बैठकीमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र स्वार्थी राजकारणासाठी हे आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

महाराष्ट्रात विमानतळाच्या नामकरणासाठी विधानसभेच्या ठरावाची आवश्यकता असते. मात्र त्यावेळी भाजपचे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आपल्या १०५ आमदारांना विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी विरोध करतील का ? आणि याबाबत ते जाहीर करणार का ? या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यावे आणि मगच प्रकल्पग्रस्तांना यांचे स्वार्थी राजकारण लक्षात येईल. तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते दि.बा. पाटील यांच्या नावाला समर्थन करणार की मग बाळासाहेब ठाकरे यांना ? याचे उत्तरही त्यांनी द्यावे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येत आहे, या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण कुटुंबातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी केल्यानंतर त्यांच्या घरात कोरोणामुळे काही आघात झाल्यास रामशेठ ठाकूर यांच्यासह दोन आमदार जबाबदारी घेणार का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना बबनदादा पाटील पुढे म्हणाले की, पनवेल उरणमध्ये भाजपच्या दोन आमदारांसह राज्यातील भाजप नेते पनवेलमध्ये येतात, विमानतळ नामकरणाची निवेदने घेतात, मग या विषयावर आपली मते का मांडत नाहीत, यावरून हा भाजप पक्षाने उचललेला मुद्दा नसून हे यांनी स्वार्थी राजकारण करण्यासाठी केलेले षड्यंत्र आहे. आणि हेच आम्ही याद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या, भूमिपुत्रांच्या निदर्शनास आणून देत आहोत. यावेळी शेवटी बोलताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की, पनवेल उरण महाविकास आघाडीची स्वर्गीय दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती, आहे तसेच ती कायम राहणार आहे. दि.बा.पाटील यांची अपूर्ण कामे आमच्या मार्फत सुरूच राहतील. स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या गरजेपोटी घरांना कायम करण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे, पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आधीच त्रासलेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना भडकावुन त्यांचे संसार कशाला उघड्यावर आणताय ? हे आम्ही खपवून घेणार नाही. दि.बा.पाटील हे आमचे आधार स्थान आहेत,  त्यांच्या नावासाठी मोठे प्रकल्प आपल्यासमोर आहेत. मात्र विमानतळ नामकरणासाठी रामशेठ ठाकूर यांनी केलेलं गलिच्छ राजकारण पाहता पनवेल-उरण महाविकास आघाडी स्व. बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावावर ठाम राहिली आहे आणि राहणार असल्याचा सूरही यावेळी लगावण्यात आला.
Comments