पनवेल / साहिल रेळेकर :- पनवेलमध्ये सोयीसुविधांनी सज्ज असे संजय क्लिनीक मातोश्री धमके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते व महापौर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.२० जून) करण्यात आले.
अत्याधुनिक, परवडणारे आणि नैतिक या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पनवेलमध्ये संजय क्लिनिक मातोश्री धमके हॉस्पिटल रुग्णांना उपचार देण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ पनवेलमध्ये रुग्णांना सेवा देणारे घोडके हॉस्पिटल नव्या रुपात पदार्पण करीत आहे. अत्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह मातोश्री धमके हॉस्पिटल आरोग्य सेवेसाठी तत्पर झाले आहे.
पनवेल शहरात सन १९७४ पासून घोडके रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणारे हॉस्पिटल हे डॉ. जगदीशचंद्र घोडके यांनी संजय क्लिनिक या नावाने सुरू केले, नंतर डॉ. राहुल घोडके यांनी ऑर्थोपेडिक रुग्णालय म्हणून चालविले. आता हेच रुग्णालय संजय क्लिनिक मातोश्री धमके हॉस्पिटल म्हणून सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका विद्या गायकवाड, माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी सिनिअर सर्जन डॉ. जगदीशचंद्र घोडके, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.राहुल घोडके, गायनॅकोलॉजी व लॅपरोस्कोपी सर्जन डॉ. गणेश वाकचौरे, डॉ.सुप्रिया वाकचौरे, पॅथोलॉजीस्ट डॉ. संतोष वाकचौरे, डॉ.अरुणा वाकचौरे,
गायनॅकोलॉजीस्ट डॉ. राजश्री धमके, कार्डिओलॉजीस्ट डॉ. सागर तांडेल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मातोश्री धमके हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्वच अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली रुग्णांना मिळणार असल्याने नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उद्धाटनप्रसंगी शुभेच्छा देताना म्हणाले की, घोडके हॉस्पिटल हे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून पनवेलमध्ये विश्वसनीय हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. आता रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देण्यासाठी नव्या रूपात पदार्पण करीत आहे. अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण हॉस्पिटल सुरू झाल्याने रुग्णांनाही चांगले उपचार मिळतील अशी खात्री आहे. सर्व हॉस्पिटल प्रशासनाच्या सेवाभावी वृत्तीला व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
मातोश्री धमके हॉस्पिटलचे गणेश वाकचौरे उद्घाटनप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, मातोश्री हॉस्पिटल गेल्या ८ वर्षांपासून कामोठेमध्ये कार्यरत आहे. पनवेल परिसराला व रायगड जिल्ह्यासाठी सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा मिळावी असा मानस होता. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना अत्युच्च व अत्याधुनिक आरोग्य सेवा देता येईल. या अनुषंगाने प्रगत, परवडणारे व नैतिक या त्रिसूत्रीचया आधारे मातोश्री धमके हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज आहोत. पनवेलसह रायगड जिल्ह्यातील रुग्णांनाही ऍडव्हान्स उपचारासाठी मुंबई बाहेरील सर्जनवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु मातोश्री हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत.