मुंबई दि.१८ जून - नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. जेआरडी टाटा यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. पण नवी मुंबईचा विकास दि. बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यांचं नाव द्यावं असा भूमिपुत्रांचा आग्रह असुन त्यानुसार विमानतळाला नाव द्यावं, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाज भूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असे दरेकर यांनी सांगितले.