नागरी आरोग्य केंद्राच्या बाबत हस्तांतरणाची टोलवा टोलवी करू नका; भाजपा युवा नेते समिर केणी यांचा प्रशासनाला इशारा...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोड मधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य नागरी आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे युवा नेता तथा माजी सरपंच समीर केणी यांनी प्रशासनाला हस्तांतरणाची टोलवा टोलवी करू नका असा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना समीर केणी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी हे नागरी आरोग्य केंद्र धूळखात पडले असल्याची माहिती मी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच तातडीने आमदार प्रशांत दादा ठाकुर यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. त्यांनी तातडीने सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. आमच्या मागणीची दखल घेऊन सध्या या नागरी आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक  लसीकरण केले जाते. कुठेतरी केंद्र सुरू झाल्याचे समाधान असले तरी सुद्धा, येथील बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग, गरोदर स्त्रिया,स्तनदा माता यांच्या साठीची ओपीडी, औषध केंद्र, मलम पट्टी विभाग अशा अनेक सुविधा सुरू व्हायच्या आहेत. याबाबत पाठपुरावा केला असता सिडकोच्या वतीने असे सांगण्यात येते की, केंद्र उभारण्याची जबाबदारी आमची होती आता हे केंद्र आम्ही रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहे. परंतु माझे असे ठाम सांगणे आहे की, आधी सेवा कार्यान्वित करा आणि मगच राजिप कडे हस्तांतरित करा. हस्तांतरणाच्या टोलवाटोलवी मुळे जर नागरिकांच्या जिवाशी खेळणार असाल तर आम्हाला आक्रमक आंदोलन छेडावे लागेल.
समीर केणी यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी प्रचंड पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे अंशतः सुरुवात झाली आहे. परंतु प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे अजूनही हे नागरी आरोग्य केंद्र त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार सुरू होऊ शकलेले नाही. कोरोना विषाणूच्याbलाटेमध्ये जर आपण नागरिकांना आरोग्य केंद्राची सुविधा देऊ शकलो नाही तर त्या केंद्रांचा उपयोगच काय? त्यामुळे प्रशासनाने आमच्या भावनांची कदर करून तातडीने हे नागरी आरोग्य केंद्र परिपूर्ण क्षमते सह सुरू करावे.
Comments