एम.एम.आर.डी.ए च्या लोह व स्टील कमिटीवर नगरसेवक बबन मुकादम यांची सर्वानुमते निवड..

      पनवेल :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या लोह व स्टील मार्केट समितीवर पनवेल महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक बबन मुकादम यांची सदस्य पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अत्यंत महत्त्वाच्या पदी नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेवक बाबांना मुकादम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
       पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्टील मार्केट कमिटीचे कार्यक्षेत्र आहे. एम एम आर स्पेसीफाईड कमोडिटी मार्केट एक्ट १९८३ कलम ९(१) नुसार सदर मार्केट ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असेल त्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांकडून एका नगरसेवकाची नेमणूक सदर मार्केट कमिटीवर सदस्य म्हणून करण्यात येते. तूर्तास स्टील मार्केट कमिटी वर २२ सदस्य असून त्यांतील सहा सदस्यांची नेमणूक निवडणूक प्रक्रिया नुसार करण्यात येते तर अन्य १६ सदस्य विविध आस्थापनांच्यातून नियुक्त केले जातात.
     पनवेल महानगरपालिकेच्या जून महिन्यातील सर्व साधारण सभेमध्ये नगरसेवक हरीश केणी यांनी स्टील मार्केट कमिटी वर सदस्य पदी नियुक्त करण्यासाठी नगरसेवक बबन मुकादम यांचे नाव सुचविले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यास अनुमोदन दिल्यानंतर बबन मुकादम यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बबन मुकादम कळंबोली कॉलनी मध्ये वास्तव्यास असल्या कारणामुळे स्टील मार्केटशी निगडित समस्या सोडविण्यासाठी ते कायम अग्रस्थानी राहिले आहेत. स्टील कमिटीचे अध्यक्ष, व्यापारी प्रतिनिधी, वाहतूकदार यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेणार असल्याचे बबन मुकादम यांनी सांगितले. तसेच त्यांच्या नियुक्तीला दुजोरा दिल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांचे आभार मानले.
    नियुक्ती नंतर नगरसेवक बबन मुकादम यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी बबन मुकादम यांना यशस्वी कारकिर्दी करता शुभेच्छा दिल्या.
Comments