महादेव वाघमारे यांचा शेकापमध्ये प्रवेश ; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
पनवेल(प्रतिनिधी) ; सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी दुपारी आमदार बाळाराम पाटील, महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू यांच्या उपस्थितीत शेकतरी कामगार पक्षात प्रवेश केला. 

यावेळी आमदार भाई बाळाराम पाटील यांनी महादेव वाघमारे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहर व जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर केले व निवडीचे पत्र वाघमारे यांना दिले.

यावेळी बोलताना आ.बाळाराम पाटील म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून महादेव वाघमारे हे पनवेल व खांदा कॉलनीतील विविध प्रश्नांवर लढत आहेत, आणि जनतेची कामे करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचा आमच्या पक्षाला नक्की फायदा होईल. अशा सक्रिय धडाडीच्या कार्यकर्त्याची पनवेल शेकापला आवश्यकता होती ती वाघमारे यांच्या प्रवेशाने पूर्ण झाली आहे. शेकाप पक्षाच्या वतीने कामासाठी महादेव वाघमारे यांना सर्व प्रकारची पूर्ण ताकत दिली जाईल. 

यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून मी कामगारांच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर लढतोय पण आता शेतकरी कामगार पक्ष या पुरोगामी पक्षाच्या माध्यमातून त्या लढ्याला अधिक बळ मिळेल. आता जनतेच्या प्रश्नांचा लढा अधिक बळकट करू, आता पनवेल महानगरपालिकेत कामगारांचे प्रश्न, कचरा प्रश्न सोडवू व जनतेला न्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अहोरात्र लढा देऊ.

यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, विष्णू जोशी, शंकर म्हात्रे, श्याम लगाडे, गोपाळ भगत,जेष्ठ पदाधिकारी शिवाजी थोरवे, विजय काळे, गणेश पाटील आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडळचे श्याम लगाडे, महेंद्र कांबळे, संदीप भालेराव, मुकुंद रोटे, सुभाष गायकवाड, तक्षशिला बुद्धविहार चे अध्यक्ष सुभाष धोत्रे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम शेकाप कार्यालयात साधेपणे उत्साहात संपन्न झाला. लवकरच लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यकर्ता प्रवेश मेळाव्याचा भव्य जाहीर कार्यक्रम होणार घेणार आहे असे शेवटी वाघमारे यांनी सांगितले.
Comments